
मुंबईत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. पगारवाढीसह अन्य काही मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सातव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कामगार संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. ‘समान काम, समान वेतन’ द्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेत कायमस्वरूपी घ्या आणि पगारवाढ द्या अशा मागण्यांसाठी ‘बेस्ट’ कंत्राटी कामगारांनी गेल्या सात दिवसांपासून आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. हळूहळू मोठ्या संख्येनं कामगार या संपात सहभागी झाल्यानं मुंबई शहर व उपनगरातील बस सेवा चांगलीच कोलमडली. त्यामुळं मुंबईकरांचे मोठे हाल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टच्या आंदोलन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजपासून संप मागे घेत असल्याची या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घोषणा केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस होता. मुंबईतल्या आझाद मैदानावर हे कर्मचारी आपल्या मुलाबाळांना घेऊन आंदोलनासाठी बसले होते.
सायबर क्राइम शाखेचे प्रमुख असलेल्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांचेच सोशल मीडिया अकाऊंट ‘हॅक’ कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारी पातळीवर प्रश्न सुरू होते. मात्र, तोडगा निघत नव्हता. जवळपास ८०० बसेस आगारातच अडकून पडल्यानं मुंबईकरांची कोंडी झाली होती. राज्य सरकारनं एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, तरीही मुंबईकरांना व्यवस्थित सेवा मिळत नव्हती.
या सगळ्या परिस्थितीवर व कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींची व मुख्यमंत्री शिंदे यांची सोमवारी रात्री उशिरा बैठक झाली. या बैठकीत कामगारांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या.
त्यानंतर आज सकाळी आझाद मैदानात एकत्र येऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यात आल्याची घोषणा केली. मुंबईकरांना अधिक त्रास होऊ नये अशी भूमिका दोन्ही बाजूंनी मांडण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं.