आमदार संग्राम जगताप यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन
अहमदनगर प्रतिनिधी

भिंगार छावणी मंडळाच्या हद्दीत बहुमजली इमारती बांधण्यात परवानगी देण्यासाठी नियम शिथिल करावेत, मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देण्यासाठी केंद्राकडून निधी उपलब्ध करून द्यावा, आमदार निधीतून कामे प्रस्तावित करण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात, या नियमात सुधारणा करावी, अशा विविध मागण्यांसह तेथील समस्यांबाबत आमदार संग्राम जगताप यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन देऊन लक्ष वेधले.
मंत्री सिंह हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार जगताप यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते. भिंगार परिसर छावणी मंडळाच्या अखत्यारित येत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा परिसर शहराचा विकसनशील भाग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात इमारती व बहुमजली व्यापारी संकुले बांधणे आवश्यक आहे. मात्र, छावणी मंडळाच्या निर्बंधांमुळे येथील समस्यांबाबत नागरिक आणि विकसक अडचणीत आहेत. येथे दुमजली इमारतीला परवानगी मिळत नाही. राज्य सरकारच्या अखत्यारीतील बांधकाम विभागाच्या नियमानुसार या भागात परवानगी दिल्यास या परिसराचा विकास होईल. त्यामुळे या नियमात सुधारणा करावी.
या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. छावणी मंडळाच्या रुग्णालयात नागरिकांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संख्याही कमी आहे. या प्रकरणी लक्ष घालून नियमात सुधारणा कराव्यात, छावणी मंडळासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
बेलेश्वर व वीर गोगादेव मंदिर खुले ठेवावे
छावणी मंडळ परिसरात प्राचीन बेलेश्वर मंदिर आहे. येथे दररोज भाविकांची गर्दी असते. तसेच भिंगार नाला परिसरात वीर गोगादेव महाराज मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे संरक्षण विभागाच्या आवारात येतात.
सुरक्षा आणि इतर कारणांमुळे ही मंदिरे वर्षातून अनेक वेळा बंद असतात. या धार्मिक स्थळांप्रती भाविकांची भावना लक्षात घेऊन दोन्ही मंदिरे नेहमी भाविकांसाठी खुली ठेवावीत, याबाबत प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी मागणीही आमदार जगताप यांनी केली आहे.