पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरणातील सियाने पोलिसांना सांगितलं की तिला केतनबरोबर लग्न करायचं नव्हते……
पुणे

पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरणातील अनेकविध धक्कादायक खुलासे तपासातून समोर येत आहेत. लोणावळा येथील लोहगड येथे केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच त्याची दरीत ढकलून हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे महाराष्ट्रभर खळबळ माजली.
दरम्यान, आता या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हत्येमागे कोणताही हेतू सूड, पैसा किंवा कौटुंबिक वैर नसून सियाला हवा असलेला वेळ मिळवणे हा आहे. इंडिया टुडेने तपास अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाने पोलिसांना सांगितलं की, तिला केतनबरोबर लग्न करायचं नव्हतं. केतनची हत्या केल्यास तिला लग्नाचा विचार करण्यास किमान आणखी तीन वर्षे मिळतील, असा तिचा समज होता. तसंच, सियाचा प्रियकर आणि या प्रकरणातील सह आरोपी चेतन चौधरी यालाही सियाबरोबर लग्न करण्यासाठी आणखी दोन ते तीन वर्ष वेळ हवा होता, असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे हे लग्न मोडून समाजात बदनामी करण्यापेक्षा केतनची हत्या करणं त्यांना योग्य वाटलं, असं तपास अधिकाऱ्यांनी नोंदवलं.
तपासातून असंही समोर आलं की साखरपुड्याच्या काही आठवड्यांपूर्वीच चेतन आणि सिया राजस्थानला गेले होते. तिथे ते पाच दिवस राहिले. चेतन हा मूळचा राजस्थानचा असून या ट्रीपदरम्यानच हे दोघे अधिक जवळ आले. तसंच, चेतन हा सियाच्या कुटुंबासाठी अनोळखीही नव्हता. कारण, चेतन आणि सियाचा भाऊ साहिल हे एकमेकांचे चांगले मित्र होते. साहिल मुळेच चेतन आणि सियाची ओळख झाली. भावासोबत मॅच पाहण्यासाठी गेली असतानाच सियाची चेतनशी पहिल्यांदा भेट झाली आणि नंतर त्यांच्यात पुन्हा संपर्क वाढला, असा पोलिसांचा अंदाज आहे.




