नगर शहरात टरबूज परत केल्याच्या रागातून तरूणासह नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण
अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील प्रेमदान चौकातील स्मार्ट बाजाराजवळ खरेदी केलेले टरबूज परत केल्याच्या कारणावरून मोठा राडा झाल्याची घटना सोमवारी (4 मे) सायंकाळी घडली. विकत घेतलेले टरबूज खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी गेलेल्या राहुरी येथील तरूणासह त्यांच्या नातेवाईकांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच महिलेसोबत गैरवर्तन केले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुळ राहुरी तालुक्यातील एका गावात व सध्या सावेडी उपनगरात राहणार्या तरूणाने (वय 41) मंगळवारी (5 मे) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदेश संजय नारद, संजय नारद, माया संजय नारद (सर्व रा. भुतकरवाडी, भिंगारदिवे मळा, सावेडी) आणि एका अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आपल्या नातेवाईकांसह सावेडी येथील स्मार्ट बाजार परिसरात खरेदीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी संशयित आरोपींकडून टरबूज खरेदी केले होते. मात्र, टरबूज खराब निघाल्याने ते परत करण्यासाठी गेले असता संशयित आरोपींना त्याचा राग आला.
याच वादातून संशयित आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मेहुण्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच फिर्यादीसोबतच्या महिलेला धक्काबुक्की करत विनयभंग केला. तुम्हा सर्वांना बघून घेतो. अशी धमकी देत संशयित आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसांनी गुन्हा नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.



