नगर शहरात फायनान्स कंपनीच्या रिजनल मॅनेजरचे अपहरण करून मारहाण
अहिल्यानगर

रोशन हरीराम तिडके (वय 36, रा. सध्या चंदननगर, नागपूर, मुळ रा. गोंदिया) यांनी फिर्याद दिली आहे. सदरची घटना 9 मे रोजी दुपारी घडली आहे. रोशन तिडके हे बेरार फायनान्स लिमिटेड या रिझर्व्ह बँक मान्यताप्राप्त एनबीएफसी कंपनीमध्ये रिजनल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
कंपनीचे मुख्य कार्यालय नागपूर येथे असून अहिल्यानगर येथे शाखा कार्यरत आहे. कंपनीतील माजी कर्मचारी ऋषिकेश रमेश गायकवाड याला गैरवर्तनामुळे सेवेतून काढण्यात आले होते. तो शाखा व्यवस्थापकावर कार्यरत होता.
दरम्यान, 9 मे रोजी रोशन तिडके हे कंपनीच्या कामानिमित्त अहिल्यानगर येथे आले होते. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ते सावेडी परिसरातील डौले हॉस्पिटलसमोरील एका खानावळीत जेवत असताना ऋषिकेश गायकवाड हा एका साथीदारासह तेथे आला.
गायकवाड याने तिडके यांना बाहेर बोलावून शिवीगाळ केली. तुझ्यामुळेच मला नोकरीवरून काढण्यात आले, आज तुला सोडणार नाही, अशी धमकी देत त्यांना मारहाण केली. त्यानंतर तिडके यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून चंदुकाका सराफ दुकानामागील रस्त्याने एका ढाब्याजवळ नेले. तेथे आधीपासून काही अनोळखी व्यक्ती लोखंडी रॉड व धारदार शस्त्रे घेऊन उभ्या होत्या.
सर्वांनी मिळून तिडके यांच्यावर सामूहिक हल्ला केला. हल्ल्यानंतर ऋषिकेश गायकवाड याने तिडके यांच्या खिशातील कंपनीने प्रवासासाठी दिलेली आठ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.




