संघर्षातून यशाची गाथा..भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेत कामगिरी
अहिल्यानगर

दहावी व बारावीत गुणवत्ता सिध्द, दिवसभर काम, रात्री शिक्षण आणि बोर्डात यश..परिस्थिती शिक्षणाची जिद्द असलेल्यांना थांबवू शकत नाही -डॉ. पारस कोठारी..
आर्थिक, सामाजिक तसेच कौटुंबिक अडचणींवर मात करत शिक्षणाची जिद्द कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी रात्र शाळेत शिक्षण घेऊन पुन्हा एकदा यशाचे शिखर गाठले आहे. दिवसभर काम करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी निर्माण केली.
हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एसएससी (इयत्ता 10 वी) व एचएससी (इयत्ता 12 वी) बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळविले. काहींना. खाजगी कंपनीत व विविध ठिकाणी दिवसा काम करुन रात्री शिक्षण घेतले. कार्यक्रम प्रसंगी रात्रशाळेत प्रवेशित होऊन इयत्ता १२ वीतील अनिशा आल्हाट, प्रिया आल्हाट, स्वाती अल्हाट या तिघी सख्या बहिणी, सुनीता लक्षेटी -ममता लक्षेटी या बहिणी, सोनाली शिंदे व पूजा शिंदे या जावा जावा व योगेश शिंदे व सोनाली शिंदे पती-पत्नी, दिपाली बनकर- राज बनकर आई -मुलगा, इयत्ता दहावीतील नवरा- बायको विजय लोंढे व निर्मला भालेराव यांनी यश संपादन केल्याबद्दल व रात्रशाळेत प्रवेशित आई सोबतच अभ्यास करणारे आई-मुलगा रुकसार शेख-अब्दुल शेख, पल्लवी गायकवाड-श्रेयस आई-मुलगी, स्वाती गडाख-ऋतुजा देखील एकत्र परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात नाईट हायस्कूलच्या माजी चेअरमन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी तसेच नाईट हायस्कूलचे विद्यमान चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रात्रशाळेचे प्राचार्य सुनिल सुसरे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
इयत्ता 10 वीच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 76 टक्के लागला. यामध्ये प्रथम : रेश्मा संपतलाल गांधी 69.80%, द्वितीय : अलीस जॉन डिसोजा 69.40%, तृतीय : रेखा अशोक गायकवाड 66.40% या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही सातत्यपूर्ण अभ्यास करत उल्लेखनीय यश मिळविले.
इयत्ता 12 वी कला शाखेचा निकाल 65.90 टक्के लागला. यामध्ये प्रथम : रूपाली मेघना बिल्ला 63%, द्वितीय : अनिशा राजेंद्र अल्लाट 58.50%, तृतीय : प्रिती बाळू कांबळे 55.67%.
वाणिज्य शाखेचा निकाल 30 टक्के लागला. यामध्ये प्रथम : अश्विनी दिलीप गुंजाळ 56%, द्वितीय : अंजली संजय नांगरे 50%, तृतीय : वैष्णवी दत्तात्रय जोशी 48% व तृप्ती नंदकुमार गाडे 48% या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर विद्यालयाचा गौरव वाढविला.
प्रा. ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या की, “रात्रशाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने जिद्दीचे प्रतीक आहेत. अनेक विद्यार्थी दिवसभर नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून रात्री शिक्षण घेतात. अशा परिस्थितीत त्यांनी मिळविलेले यश हे अत्यंत कौतुकास्पद आहे. शिक्षणामुळेच जीवनाला नवी दिशा मिळते.
या विद्यार्थ्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल. संस्थेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, परिस्थिती माणसाला थांबवू शकत नाही, हे इयत्ता १० वी, १२ वी मधील विद्यार्थिनींनी प्रथम तीन गुणानुक्रम मिळवून सिद्ध करून दाखविले आहे. शिक्षणासाठी असलेली त्यांची तळमळ आणि मेहनत प्रेरणादायी आहे. रात्रशाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून अनेक विद्यार्थ्यांसाठी नव्याने आयुष्य घडविण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि चिकाटीच्या बळावर यश मिळविले असून, भविष्यातही ते विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवतील, असा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य सुनील सुसरे यांनी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी रविवारी जादा तासाचे आयोजन करणे असे विविध प्रकारचे सहकार्य करणाऱ्या मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, डायरेक्टर कमलाकर माने, युवराज बोऱ्हाडे, एसएससी प्रमुख शशिकांत गवस, गुरुप्रसाद पाटील, संदीप शेलार, निलेश ठोंबरे, संदीप सूर्यवंशी व सर्व टीम तसेच रोटरी क्लबच्या डॉ. बिंदू शिरसाठ यांनी रोटरी क्लब मार्फत विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲप दिल्याने विद्यार्थ्यांना यश प्राप्त करण्यास मदत झाली त्याबद्दल त्यांचे आभार मानले
सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, मानद सचिव संजय जोशी, माजी कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, अनंत फडणीस, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलालजी सारडा, अजितशेठ बोरा, कार्यकारिणी सदस्य व शालेय समिती सदस्यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव राऊत यांनी केले. आभार बाळू गोरडे यांनी मानले.



