ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र.. नक्की फायद्याचे काय?

स्वतःच्या मिळकतीचे मृत्युपत्र करून ठेवावे का बक्षीसपत्र करावे? याबाबत बऱ्याच ज्येष्ठांची गल्लत होते. खरेतर या दोन्ही दस्तांची जातकुळी वेगळी आहे. मृत्युपत्राचा अंमल ते करणाऱ्याच्या मृत्यूनंतर होतो. बक्षीसपत्राद्वारे दिलेले हक्क आणि अधिकार हे त्या व्यक्तीच्या हयातीमध्येच तबदील होतात.

स्वतःच्या मिळकतीचे मृत्युपत्र करून ठेवावे का बक्षीसपत्र करावे? याबाबत बऱ्याच ज्येष्ठांची गल्लत होते. खरेतर या दोन्ही दस्तांची जातकुळी वेगळी आहे. मृत्युपत्रासाठी कोणताही स्टॅम्प द्यावा लागत नाही, त्याचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही (तरीही ते जरूर करावे), लाभार्थ्यांना ते मान्य आहे असे लिहून द्यावे लागत नाही.

मात्र बक्षीसपत्रासाठी मात्र या तिन्ही गोष्टी करणे अनिवार्य आहे. मृत्युपत्राचा अंमल हा ते करणाऱ्याच्या मृत्यूनंतर होतो, तर बक्षीसपत्राद्वारे मिळालेल्या मिळकतीवरील हक्क आणि अधिकार हे त्या व्यक्तीच्या हयातीमध्येच तबदील होतात. या लेखाद्वारे आपण बक्षीसपत्राबाबत थोडक्यात माहिती घेऊ.

स्वतःच्या मालकीची आणि ‘अस्तित्वात’ (existing) असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत बक्षीसपत्राने तबदील (ट्रान्सफर) करता येते. जो मिळकत लिहून देतो त्याला ‘डोनर’ आणि ती ज्याला मिळते त्याला ‘डोनी’ म्हणतात. थोडक्यात जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचे बक्षीसपत्र करता येत नाही.

संपूर्ण मिळकतच बक्षीस द्यावी लागते असे नाही, मिळकतीचा ठराविक हिस्सा देखील देता येतो. हल्ली पुनर्विकासामध्ये नवीन फ्लॅटवर मुलांचे नाव येण्यासाठी जुन्या फ्लॅटचे संपूर्ण किंवा ५० टक्के हिश्श्याचे बक्षीसपत्र करून ठेवतात. कारण ज्यांच्या नावावर जुना फ्लॅट असतो त्यांचेच नवीन फ्लॅटवर नाव लागू शकते.

विनामोबदला केलेले ‘खरेदीखत’ बेकायदेशीर ठरते. बक्षीसपत्र मात्र ‘विना मोबदलाच’ असावे लागते. काही अटींना अधीन राहून म्हणजेच ‘कंडिशनल’ बक्षीसपत्र देखील करता येते आणि त्या अटींची पूर्तता न झाल्यास बक्षीसपत्र रद्द करण्याचा अधिकार ‘डोनर’ला असतो. बक्षीसपत्र हे प्रेमापोटी, आपुलकीपोटीच असले पाहिजे, अशी व्यवहारात पद्धत असली तरी अशी अट कायद्यात नाही.

स्थावर मिळकतीचे बक्षीसपत्र वैध होण्यासाठी ते नोंदणीकृत करणे म्हणजेच ‘रजिस्टर’ करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यावर डोनर आणि दोन साक्षीदारांची सही असणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘डोनी’ने देखील ‘बक्षीसपत्र मान्य आहे’ असे लिहून सही करणे गरजेचे आहे. जंगम (मुव्हेबल) मिळकतीचे बक्षीसपत्र हे नोंदणीकृत दस्ताने किंवा प्रत्यक्ष त्या वस्तूचा ताबा देऊन करता येते.

महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट अन्वये बक्षीसपत्र नोंदवण्यासाठी अनुच्छेद ३४ अन्वये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. ठराविक नात्यांमध्ये आणि निवासी किंवा शेतीच्या जागेसंदर्भात केल्या जाणाऱ्या बक्षीसपत्राला स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत आहे. मात्र पुण्यासारख्या ठिकाणी एलबीटी/मेट्रो सरचार्ज द्यावाच लागतो.

बक्षीसपत्र ‘अपवादात्मक’ परिस्थितीमध्येच रद्द करता येते. बक्षीसपत्र हे केवळ ‘अपवादात्मक’ परिस्थितीमध्येच रह करता येते. जर एखादी विशिष्ट गोष्ट घडली तर बक्षीसपत्र रद्द होईल, असे डोनर आणि डोनी यांनी ठरवले असेल आणि तशी गोष्ट घडली तर बक्षीसपत्र रद्द होऊ शकते. मात्र, अशी विशिष्ट गोष्ट घडणे किंवा न घडणे यावर डोनरचे नियंत्रण असेल तर असे बक्षीसपत्र रद्द करता येत नाही. फ्रॉड, फसवणूक, धमकी किंवा तत्सम प्रकार सिद्ध झाले तरी बक्षीसपत्र रह करता येते.

हे लक्षात ठेवा

२००७ सालच्या ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याच्या कलम २३ प्रमाणे एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने त्याचा ‘नीट सांभाळ करणार’ या अटीवर लाभार्थ्याला बक्षीसपत्र करून दिले, परंतु त्या लाभार्थ्याने असा सांभाळ केला नाही हे सिद्ध झाल्यास असे बक्षीसपत्र हे लबाडीने करून घेतले असे गृहित धरून संबंधित ट्रिब्युनलकडून रद्द होऊ शकते. तशी स्पष्ट अट बक्षीसपत्रामध्ये लिहिणे क्रमप्राप्त आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

‘जेवायचे ताट द्यावे, पण बसायचा पाट देऊ नये’ वा म्हणीप्रमाणे बक्षीसपत्र नोंदवल्यावर लगेचच मालकी हक्क जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी बक्षीसपत्र करताना हा विचार डोक्यात ठेवावा.

घर असल्यास कमीत कमी स्वतःला आणि वैवाहिक जोडीदाराला त्या फ्लॅट्मध्ये तहहयात राहण्याचा आणि फ्लॅट उपभोगण्याचा हक्क नक्की ठेवावा.

ॲड. रोहित एरंडे – पुणे

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे