मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी BMC च्या निर्णयामुळं चित्र बदललं

दरवर्षी मोठ्या आतुरतेनं सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत असतात तो क्षण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कारण, अवघ्या महिन्याभरातच लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव अनेकांसाठी खास असेल, अर्थात तो दरवर्षीच असतो. पण, दरवर्षी बाप्पाच्या निमित्तानं काही खास गोष्टी करण्याकडेच अनेकांचा कल असतो. मग ती गणेशोत्सव मंडळं असोत किंवा घरगुती गणपती. अशा या गणेशोत्सवाआधी मुंबई मगानगरपालिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
महापालिकेकडून ऑनलाईन परवानगीअंतर्गत सादर केल्या जाणाऱ्या हमीपत्रामध्ये गणपती मूर्तींची उंची 4 फूटांपर्यं असावी अशी मर्यादा घालून दिली होती. इतकंच नव्हे तर, POP ऐवजी मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीनंच तयार केलेली असावी अशीही अट तिथं घालण्यात आली होती.
ज्यामुळं अनेक गणेशोत्सव मंडळाची गाडी परवानगीपर्यंत येऊन अडली होती. किंबहुना शहरातील बऱ्याच मंडळांनी या अटीशर्तींबाबत नाराजीही व्यक्त केली होती.
पण, अखेर पालिकेनं नव्या हमीपत्राचं परिपत्रक जारी करत, त्यातून गणेश मूर्तींची उंची आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट शिथिल केली आणि गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा दिला.