
शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या आणि दक्षिणेतून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी द्या, अशी मागणी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे केली.
हंडोरे यांच्या उपस्थितीत रविवारी संगमनेर व नगर शहरात दोन्ही लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, पक्षाचे प्रदेश सचिव सचिन जाळ, ज्ञानेश्वर गायकवाड, महासचिव वीरेंद्र किराड, युवकचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाबळे, ज्ञानदेव वाफारे, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, सुनील क्षेत्रे यांच्यासह दक्षिणेतील पदाधिकारी उपस्थित होते.
नगर येथील बैठकीत बोलताना आ. कानडे म्हणाले, काँग्रेसची ही सुवर्णभूमी आहे. ज्यांना पन्नास वर्षे काँग्रेसने सर्व दिले त्यांनीच ताटात छेद दिला. बाळासाहेब थोरात यांनी या जिल्ह्यात काँग्रेसला संभाळले.
अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांना आधार दिला. आता लोकसभेला जिद्दीने उभे राहण्याचा मानस कॉंग्रेसने केला आहे. म्हणून दोन्ही मतदारसंघ काँग्रेसने घ्यावे.
किरण काळे म्हणाले, दक्षिणेतून पक्षाचा उमेदवार शतप्रतिशत निवडून येऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या १८ लोकसभा निवडणुकांपैकी बारावेळा येथून काँग्रेसचा खासदार निवडून आला आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभा मतदारसंघ व लोकसभेची जागा काँग्रेसकडे घेऊन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी करावी.
यावेळी पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील, जामखेड तालुकाध्यक्ष शहाजी भोसले, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष धर्मनाथ काकडे, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, पारनेर तालुकाध्यक्ष संभाजी ढोकले, पाथर्डी तालुकाध्यक्ष नासीरभाई शेख, युवकचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाबळे यांनी भूमिका मांडून मतदारसंघ पक्षाकडे घेण्याची मागणी केली. बैठकीचे संयोजन प्रदेश सचिव गुंजाळ व गुंदेचा यांनी केले.