ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

वैयक्तिक हेवेदावे विसरून नगर अर्बन बँकेला परवाना पुन्हा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत

अहमदनगर

सर्व जैन बांधवांना व विशेषतः आपल्या ऐतिहासिक व ११३ वर्षांची परंपरा लाभलेल्या नगर अर्बन बँकेच्या सभासदांना माझा सादर जय जिनेंद्र व सप्रेम नमस्कार..

खरंतर माझा नगर अर्बन बँकेशी आर्थिक रित्या तसा व्यक्तिशः अगर खातेदार म्हणून संबंध नाही परंतू अहमदनगर शहराचीच नव्हे तर संबंध जिल्ह्याची अर्थ वाहिनी व जैन समाजाच्या आधिपत्या खाली सदर बँक गेली अनेक दशके सुस्थितीत चालत आल्याने या बँकेवर माझे व माझ्या सारखे अनेक तरुणांचे आपल्या बँकेवर विशेष प्रेम आहे. याच प्रेमापोटी माझे वडील स्वर्गीय धनराजजी कोठारी, मिरजगांवकर यांचा देखील या बँकेवर नितांत प्रेम व त्यांची श्रद्धा असल्याने ते स्वतः तसेच आमच्या कुटुंबातील जवळ जवळ सर्वच सदस्य या बँकेचे आम्ही मोठया अभिमानाने सभासद झालो.

परंतु दुर्दैवाने आज आपल्या या आर्थिक क्षेत्रातील मातृसंस्थेचा बैंकिंग परवाना रद्द झाल्याचा निर्णय आल्यापासून मनात अत्यंत दुःख व वेदना होत आहेत. बैंकिंग क्षेत्रात देशपातळीवर ज्या आर्थिक संस्थेने नावलौकिक मिळवलेले आहे व अहमदनगर जिल्ह्यातील अनेक लहान मोठे व्यापारी घडवणाऱ्या आपल्या बँकेचं शेवट असा होईल असे कधीच वाटले नव्हते तर तसं विचारही कधी मनाला शिवला नाही. या सर्व परिस्थितीला कोण जवाबदार आहे व कोणाची चूक तर कोण बरोबर यावर मला खल करायचा नाही परंतु एवढं निश्चित की शतकोत्तर परंपरा असलेली बँक वैयक्तिक हेवे दाव्यांना बळी पडली व बँकेवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे बँकेची अधोगती होऊन बँक आज अवसायनात निघण्याचा उंबरठ्यावर येऊन ठेपली.

बँकेचा बैंकिंग परवाना भारतीय रिज़र्व बँकेने ४ ऑक्टोबर रोजी आदेश काढत रद्द केला व संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. बँकेचे ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा परिवार एका झटक्यात निराधार झाले.

अनेक ठेवीदार व सभासद यांचे डोळे पाण्याने तरळले. जैन समाजाची बँक व जैन लोकं प्रामाणिकतेने बँक चालवतील या आशेने व या विश्वासावर अनेक ठेवीदारांनी बँकेत ठेवी ठेवलेल्या होत्या तर सभासद व ठेवीदारांच्या या विश्वासाला तडा गेला व याला जैन समाजच व जैन समाजाच्याच लोकांच्या तक्रारीच कारणीभूत असल्याबद्दल जोरदार चर्चा ही सर्वत्र रंगू लागली.

यासर्व पर्श्वभूमीवर मला आज बँकेबाबत व बँकेच्या सद्यस्थितीबाबत लिहावेसे वाटले व माझ्यासारखे बॅंकेवर प्रेम करणाऱ्या सर्वच सभासद व हितचिंतकांच्या भावना देखील माझ्या भावनांप्रमाणेच असतील यात शंका नाही म्हणून मुद्दाम बँकेतील सत्ताधाऱ्यांनी व विरोधकांनी एकत्र येऊन ज्याकाही मागील काळातील आपापसातील अडीअडचणी आहेत त्यांना तुर्तस्वरुपात पूर्णविराम देऊन समन्वयातून बँक हित कसा साधता येईल यावर विचार करण्याची आज अतोनात गरज आहे असे या लेखातून व्यक्त व्हावे याकरिता माझा एक प्रयत्न. ज्याकाही चुका अगर तथाकथित बँकेवरील व संचालकांवरील आरोप आहेत त्यानिमित्ताने कायदेशीर कारवाई सुरू आहे.

परंतु त्याचा विपर्ह्यास होऊन बँकेला अडचण निर्माण होता कामा नये हीच आमच्या सारख्या बँकेवर प्रेम करणाऱ्या एक लाखाहून अधिक सभासद व हितचिंतकांची प्रामाणिक इच्छा असून सदर सभासदांच्या भावनेचा सन्मान सर्वांनी करावा व याकामात आमची काही मदत लागल्यास आम्ही देखील पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्यास तयार राहू असे अनेकांकडून बँकेबद्दल च्या आजच्या स्थितीबाबत चर्चा करताना हळहळ व्यक्त करत सभासद बोलून दाखवतात.

आपली बँक आज या अडचणीतून कशी बाहेर पडेल, बँकेचा रद्द करण्यात आलेला बैंकिंग परवाना कशा रीतीने परत मिळवतां येईल व बँक पुन्हा पूर्वपदावर येऊन बँकेच्या माध्यमातून अनेक व्यवसायिक यांना त्यांच्या व्यवसाया निमित्ताने वित्त पुरवठा होऊन व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती कशी मजबूत होऊ शकेल हा सर्वात महत्वाचा प्रश्न व कळकळीचा मुद्दा आहे असे मला वाटते.

यासाठी सर्वच स्तरातील लोकांनी, सभासदांनी व विशेषतः समाजातील सर्वच मान्यवरांनी एकत्र येऊन बँकेवरील आपले प्रेमापोटी आपण काय प्रयत्न करू शकतो व बँक वाचवण्यासाठी काय योगदान आपण देऊ शकतो यावर विचार करण्याची गरज आहे. बँकेबाबत वैयक्तिक हेवे दावे, खरे खोटे, कोण चुकीचं तर कोण बरोबर, संचालक जवाबदार की कर्मचारी की बँकेच्या दैनंदिन कारभारात व पारदर्शी कारभार चालला आहे की नाही याबाबत जागृतता न दर्शवणारे व उदासीनता दाखवणारे सभासद या सर्व बाबी तूर्तस्वरूपात बाजूला ठेऊन टिका टिपणी व आरोप प्रत्यारोप न करता एकत्रित प्रयत्नातून बँक हित साधत बँकेचा परवाना परत मिळण्यासाठी जो कुणी प्रयत्नशील असेल त्यांच्या प्रयत्नांना बळ देऊन समाजात एक आदर्श निर्माण करुन बँक वाचवली पाहिजे व आपली जिव्हाळ्याची बँक पुन्हा एकदा दिमाखदार वाटचाल करेल अशा रीतीने सर्वांच्या भावनांचा सन्मान राखत आपण एकमेकांची सोबत करायला हवी व त्याकरिता या पुढील काळात सर्वांनी एकजुटीने सर्वतोपरी प्रयत्न करावे हीच अपेक्षा.

या लेखातून केवळ बँक हित साधण्याचा माझा उद्देश असल्याने सर्वच संचालक, कर्मचारी, ठेवीदार, सभासद व हितचिंतकांना माझं विनम्र आव्हान की सर्वांनी एकत्रित प्रयत्नातून ज्याकाही मार्गाने आपली बँक वाचवण्यास मदत होईल अशा रीतीने आपण व्यक्तिक हेवे दावे बाजूला ठेऊन प्रयत्न करावे हीच नम्र विनंती.

आपला

प्रविण धनराज कोठारी

आनंद साडी, खिस्त गल्ली,

अहमदनगर.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे