सुधीर मोरे यांनी लोकलखाली घेतली उडी, कुटुंबीयांनी व्यक्त केला ब्लॅकमेलिंगचा संशय
मुंबई

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील खंदे समर्थक तथा माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे.
घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या रुळावर त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. त्यामुळे त्यांनी लोकलपुढे उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
गुरुवारी रात्री आढळला मृतदेह
सुधीर मोरे मृतदेह गुरुवारी रात्री रुळावर आढळला. आपण एका खासगी कामासाठी जात असल्याचे त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकाला सांगितले होते. त्यानंतर ते घाटकोपर – विद्याविहार दरम्यान असलेल्या एका पुलाखाली गेले. तिथे 11.30 च्या सुमारास रुळावर झोपले.
कल्याणवरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटारमनने कुणीतरी ट्रॅकवर झोपल्याचे सांगून गाडीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. पण वेग जास्त असल्यामुळे लोकल त्यांच्या अंगावरून गेली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या?
दुसरीकडे, सुधीर मोरे यांच्या आत्महत्येविषयी ब्लॅकमेलिंगचे तार उजेडात येत आहेत. सुधीर मोरे यांना गत काही महिन्यांपासून कुणीतरी ब्लॅकमेल करत होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलले. त्यांनी 2 महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॉर्ड करण्यासाठी एक नवा मोबाईल खरेदी केला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा, अशी मागणी त्यांच्या निकटवर्तीयांनी केली आहे.
कोण होते सुधीर मोरे ?
सुधीर मोरे हे उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक होते. ते रत्नागिरीचे शिवसेना संपर्कप्रमुख, शिवसेनेचे नगरसेवक व विभागप्रमुखही होते. सुधीर यांनी लोको दोस्त नावाची संघटना स्थापन केली होती. त्यातूनच त्यांचा राजकारणातील प्रवास सुरू झाला होता. त्यांच्या वहिणीही माजी नगरसेवक होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचीच साथ देणे पसंत केले.
सुधीर मोरे यांनी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना पराभव सहन करावा लागला. त्यांच्या मृत्युमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.