एप्रिल ते जून दरम्यान बसेल उन्हाचा तडाखा ?

भारतात लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. ही तयारी सुरू असतानाच हवामान विभागाचा अहवाल आला आहे. या अहवालामुळे राजकीय पक्षांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
देशाच्या मैदानी भागांमध्ये एप्रिल ते मे दरम्यान उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून दरम्यान दहा ते वीस दिवस उष्णतेची तीव्र लाट असेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पश्चिम हिमालयाचा प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि उत्तर ओडिशाच्या काही भागातही तापमानात बदल दिसू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत गुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तर छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा सर्वात वाईट परिणाम दिसून येईल.