
बेलापूर मंडळाधिकारी कार्यालयातील एका खाजगी मदतनिसला दहा हजार रुपयाची लाच स्विकारताना ला.प्र.विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील गळनिंब येथील तलाठी कार्यालयात खरेदी खताची नोंद सातबार्यावर न घेण्यासाठी हरकत अर्ज दाखल करण्यात आला आहे. सदर हरकत अर्जाची सुनावणी मंडलिक (मंडळ अधिकारी, श्रीरामपूर, अतिरिक्त कार्यभार बेलापूर) यांच्याकडे चालू आहे.
या हरकत अर्ज प्रकरणामध्ये केसचा निकाल तक्रारदारच्या बाजूने देण्यासाठी मंडळाधिकारी कार्यालय, बेलापूर येथे खाजगी मदतनीस म्हणून कार्यरत असलेले शहाजी केरु वडीतके या ंनी मंडळाधिकारी मंडलिक यांच्यासाठी 10 हजार रुपये रक्कमेची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रार ला. प्र. वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान शहाजी केरू वडीतके हा 10 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडला.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी ला.प्र.वि.अहिल्यानगर पोलीस निरीक्षक राजु आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी अजित त्रिपुटे तसेच सापळा पथक पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, उमेश मोरे, हारुण शेख यांच्या पथकाने सदर कारवाई पार पाडली.