नगर जल्लोषच्या दिवाळी उत्सवाने बालघर प्रकल्पावरून वंचित मुलांच्या चेहऱ्यावर उमटले हसू….
अहमदनगर - नगर जल्लोष परिवाराच्या वतीने बालघरातील वंचितांना दिवाळीची भेट, गुंजन शिंगवी यांचा वाढदिवसही साजरा

तपोवन रोड, अहिल्यानगर येथील बालघरातील वंचित मुलांच्या हक्काच्या घरात दिवाळीच्या औचित्याने नगर जल्लोष परिवाराच्या वतीने दिवाळी फराळ, फटाके आणि दीपोत्सव साजरा करून इथल्या वंचित मुलांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या दिवशी हसू आणले. हॉटेल ब्रम्ह भोजच्या वतीने देण्यात आलेल्या फराळाने आणि संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या फटाक्यांनी सणाला प्रकाशाच्या या सणाला नवी झळाळी मिळाली.
मिळालेला फराळ आणि फटाके फोडत, दिव्यांच्या उजेडात आणि फटाक्यांच्या आवाजात मुलांनी दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी विशेष म्हणजे संस्थेचे संयोजन समिती प्रमुख श्री गुंजन शिंगवी यांचा वाढदिवसही मुलांसोबत केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री गुंजन शिंगवी म्हणाले, “मुलांच्या चेहऱ्यावरील हा अलौकिक आनंद पाहून मला खूप आनंद झाला. हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय असणार आहे. बालघरला भविष्यात ही हवी ती मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन.”
संस्थेचे अध्यक्ष सागर बोगा म्हणाले, “आम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षीही वंचित मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येथे आलो आहोत. आपल्या माध्यमातून चार मदतीचे हात जोडणे हाच नगर जल्लोष परिवाराचा कायम उद्देश असतो. या मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हसू आमच्यासाठी अनमोल आहे. मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.”
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सागर बोगा, सचिन बोगा, लौकिक शिंगवी, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम, प्रकाश मच्चा, अक्षय आंबेकर, सौ. पल्लवी बोगा, ओवी बोगा बालघरचे युवराज गुंड आणि मुलं उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे बालघरातील वंचित मुलांच्या जीवनात थोडीशी आनंदाची झुळूक आली अशी भावना युवराज गुंड सरांनी व्यक्त केली.