
नगर महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. याद्वारे महापालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची, इमारतींची, घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे.
मार्च अखेरीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश मनपा प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत. दरम्यान, गेल्या २० वर्षात शहरात सर्वेक्षण झालेले नाही. महापालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी सर्वेक्षण होऊन पुनर्मल्यांकन करणे अपेक्षित आहे. आता हाती घेतलेल्या मालमत्तांच्या सर्वेक्षणामुळे व पुनर्मूल्यांकनामुळे शहरातील सर्व मालमत्तांना कर आकारणी होईल.
मार्च महिन्यानंतर नव्या मोजमापांच्या नोंदीनुसार कर आकारणी केली जाणार आहे. यातून महापालिकेचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास प्रशासक डांगे यांनी व्यक्त केला.