
नगर शहर व जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाचे गुरुवारी सायंकाळी पुनगरागमन केले. शुक्रवारीही जोरदार पाऊस झाला. पुढील दोन दिवस जिल्ह्यात विजेच्या कडकटांसह वादळी वाऱ्याच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
नगर जिल्ह्याकडे गेल्या तीन महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम वाया गेला होता पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. जिल्ह्यात कमी पावसामुळे खरीप पिकाची पैसेवारी ५० पेक्षा कमी झाली आहे. २६१ गावांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
शहर व परिसरात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शहरातील बहुतेक रस्त्यांवर पाणी साचले होते. मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी रब्बी हंगामासाठी आणखी दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.