जेजुरीच्या खंडोबा गडावर शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना.. चंपाषष्ठी उत्सवास प्रारंभ
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करून सोमवारी चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करून सोमवारी चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली.
मुख्य मंदिरातील उत्सवमूर्तींची पाकाळणी, पूजा-अभिषेक झाल्यावर सकाळी अकरा वाजता उत्सवमुर्ती सनई-चौघड्याच्या निनादामध्ये नवरात्र महालात आणण्यात आल्या. यावेळी ‘सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली.
नवरात्र महालात धार्मिक वातावरणात खंडोबा-म्हाळसा देवीच्या मुर्तीची घटस्थापना करण्यात आली. वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी आणि मंगेश खाडे यांनी पौरोहित्य केले.
देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपटराव खोमणे, अनिल सौंदडे, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, पुजारी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, प्रशांत सातभाई, चेतन सातभाई, बाळासाहेब दीडभाई, देवल बारभाई, मल्हार बारभाई, धनंजय आगलावे, हनुमंत लांघी, समीर मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान यांच्या वतीने सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गडावर मार्तंडविजय ग्रंथाचे पारायण, मल्हारीसहस्त्रनाम याग होणार आहे. गुरुवारी (५ डिसेंबर) देवदिवाळी उत्सवानिमित्त नवरात्र महालात फराळाचा रुखवत मांडला जाणार असुन शुक्रवारी (६ डिसेंबर) रात्री खंडोबा देवाला तेलवण करुन हळद लावली जाणार आहे.