
शहरात गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाढवळ्या सर्रास गावठी कट्टे घेऊन गुंड, टवाळखोर, मवाली बिनधास्त फिरत आहेत. चालता-बोलता गोळ्या झाडत आहेत. भोसकण्याचा चाकू घेऊनही काही जण फिरत आहेत.
दररोज वाढणाऱ्या चोऱ्या, हाणामाऱ्या, गोळीबार चिंतेचा विषय झाला आहे. त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणतात की, हे शहर बिहारसारखे झाले आहे. त्यांचे म्हणणे चुकते आहे. या शहराची बिहारमधील शहराशी तुलना होऊ शकत नाही. कारण बिहारमध्ये दारूबंदी आहे. इथे तर खुलेआम दारू विक्री सुरू आहे. दारुड्यांचा, नशेखोरांचा धुमाकूळ सुरू आहे.
त्याचा व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. खरे तर कोणत्याही शहराची प्रगती तेव्हाच होते, जेव्हा ते शहर पूर्णपणे सुरक्षित असते. त्यामुळे गुन्हेगारी वाढण्यासाठी फक्त पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येणार नाही. टवाळखोर, गुंडांना पकडल्यावर पोलिसांना पहिला फोन राजकारण्यांचा जातो. परवान्याविना पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या मुलाला सोडण्यासाठी राजकारणी फोन करतात.
तोच मुलगा पुढे पिस्तुलातून गोळीबार करू लागतो. विरोधी पक्षनेते वाढत्या गुन्हेगारीसाठी एक बोट पोलिसांकडे दाखवतात, तेव्हा तीन बोटे राजकारण्यांकडे असतात.
सगळे खापर पोलिसांच्या माथ्यावर फोडून चालणार नाही. या शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. ते चांगले झाले, पण छत्रपती संभाजीनगर आता सुरक्षितनगर करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.