
अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणी डॉ.निलेश विश्वास शेळके याला सोमवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
उपअधीक्षक भारती हे तपास करीत आहे. आरोपीला अटक करू नये यासाठी अनेकांनी मध्यस्थी केली पण तपासी अधिकारी यांनी ती धुडकावून अटक केली. या प्रकरणातील यापूर्वी अटक केलेले पंधरा ते सोळा जण जेलमध्ये आहेत डॉ निलेश शेळके याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली नगर अर्बन बँकेचे कामकाज सुरू होते. त्यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळाने गैरकारभार केला होता. त्यामुळे बँकेची चौकशी व्हावी, अशी मागणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्यासह पोपट लोढा, अच्युत पितळे, राजेंद्र चोपडा यांनी केली होती.
शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेला त्यांच्या काळात घरघर लागल्याचे बोलले जात होते. बँकेचा कारभार मनमानी पद्धतीने हाकल्यामुळेच बँक डबघाईला गेली. आता बँक बंद झाली असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.
माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे पोलिसांनी फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले आहे.
यात प्रथमदर्शनी १०५ जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यात सुमारे २९१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
बँकेतील कर्ज प्रकरणांमध्ये कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेचा गैरवापर, तसेच कर्जाच्या रकमेतून जुन्या कर्जाच्या रकमा भरणे, काही रक्कम संचालक अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे.
तसेच बँकेच्या शाखांतर्गत व्यवहारासाठी असलेल्या खात्यांमधून कर्जदारांच्या खात्यांमध्ये रकमा वर्ग झाल्याचेही तपासात समोर आले आहे. फॉरेन्सिक अहवालात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून, या सर्वांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या प्रकरणातील आत्तापर्यंत पंधरा ते सोळा जणांना अटक केली आहे.