ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

हिंजवडी आयटी पार्कमधून किती कंपन्या बाहेर गेल्या? एमआयडीसी अन् इंडस्ट्रीज असोसिएनशचा ताळमेळ बसेना

पुणे - हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधून गेल्या १० वर्षांत ३७ कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने केला आहे.

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधून गेल्या १० वर्षांत ३७ कंपन्या स्थलांतरित झाल्याचा दावा हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने केला आहे. यावरून राजकीय गदारोळ सुरू असून, आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) असोसिएशनचा दावा फेटाळून लावला आहे.

याचबरोबर असोसिएशनकडे या ३७ कंपन्यांची यादी मागितली आहे. दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकारच्या यंत्रणांची उच्चस्तरीय बैठक अद्याप प्रलंबित आहे.

एमआयडीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी आयटी पार्कमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नवीन कंपन्यांसाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांचे जागेसाठीचे नवीन अर्ज नाकारावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत आयटी पार्कमधून कंपन्या बाहेर पडलेल्या नाहीत. काही कंपन्या आर्थिक कारणास्तव बंद पडल्या आहेत.

याचबरोबर काही कंपन्यांनी इतर कंपन्यांना भाडेतत्वावर जागा दिली होती. त्यांना दुसरीकडे स्वस्तात जागा मिळाल्याने त्या तिकडे स्थलांतरित झाल्या आहेत.

हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ३७ कंपन्या बाहेर पडल्याचा दावा एमआयडीसीने फेटाळला आहे. या प्रकरणी एमआयडीसीने असोसिएशनला पत्र पाठविले आहे. गेल्या १० वर्षांत आयटी पार्कमधून स्थलांतरित झालेल्या कंपन्यांची यादी असोसिएशनला मागितली आहे. मात्र, असोसिएशनने यादी न देण्याची भूमिका घेतली आहे. याचवेळी एमआयडीसीकडे अशा प्रकारे कोणत्याही कंपन्या बाहेर गेल्याची माहिती नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

हिंजवडी आयटी पार्क २५ वर्षांपूर्वी सुरू झाला. आता येथे रस्ते, पाणी, कचरा आणि वीज या पायाभूत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. आयटी पार्कमध्ये १३९ कंपन्या कार्यरत असून, त्यात २ लाख १७ हजार ४१२ कर्मचारी आहेत. आयटी पार्कचा मागील काही काळात विस्तार झाला. मात्र, त्या तुलनेत पायाभूत सुविधा वाढल्या नाहीत. आता पायाभूत सुविधांची स्थिती दयनीय आहे. आयटी पार्कमधील रस्ते अरुंद असून, त्यांची स्थिती अतिशय खराब आहे. यामुळे येथे वाहतूककोंडी नित्याचीच बाब झाली आहे.

हिंजवडी आयटी पार्कमधून स्थलांतरित झालेल्या कंपन्यांची यादी एमआयडीसीने मागितल्याची माहिती नाही. आमच्या असोसिएशनच्या सदस्य असलेल्या कंपन्या बाहेर पडल्या असून, त्यांची नावे जाहीर करता येणार नाहीत.

– लेफ्टनंट कर्नल (नि.) योगेश जोशी, सचिव, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे