आषाढी यात्रेसाठी धावणार ५ हजार एसटी बस, कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बससेवा
आषाढी यात्रेसाठी राज्यातून पाच हजार आणि पुणे विभागाकडून पावणे तीनशे जादा बस सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि विभागातील १४ डेपोंतून जादा बस सोडण्याचे नियोजन आहे.

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी यात्रा कालावधीत पाच हजार विशेष बस सोडण्याचे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.
पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात. एसटीने यंदापासून त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यंत बससेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रवासात ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिला प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत आदी सुविधा आहेत. गतवर्षी एसटीने आषाढी यात्रेनिमित्त चार हजार २४५ विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्यामार्फत १८ लाख ३० हजार ९३४ भाविकांनी प्रवास केला होता.
पंढरपूर यात्रेनिमित्त फुकट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी-अधिकारी २४ तास नजर ठेवून असणार आहेत. त्याचप्रमाणे विविध मार्गांवर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारले जाणार आहेत. याशिवाय आषाढी एकादशीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक नियोजनासाठी पोलिसांच्या साह्यासह ३६पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.