
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील जनता उष्णतेने होरपळत आहे. उन्हाचे चटके असह्य होत असल्याची परिस्थिती आहे.
महाराष्ट्रासारखीच परिस्थिती राजस्थान, गुजरात अशा असंख्य राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे उन्हामुळे होणारी होरपळ आता थांबणार आहे. भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
आज आणि उद्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे.
या काळात राजधानी मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता आहे शिवाय राज्यात लवकरच मान्सूनचे आगमन होणार असे देखील आयएमडीने म्हटले आहे.
हवामान खात्याने मान्सून 19 मे रोजी अंदमानत दाखल झाल्यानंतर 31 मे ला केरळमध्ये दाखल होणार असे म्हटले होते. मात्र या अंदाजापूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. 30 मेला मान्सूनचे केरळात आगमन झाले आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? याकडे नागरिकांचे लक्ष आहे. यासंदर्भात भारतीय हवामान शास्त्र विभाग मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी माहिती दिली आहे.