अहमदनगरमध्ये २२३० नागरिकांच्या छतावर सोलर पॅनल

विजेच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याचा भूर्दंड वीज ग्राहकांना बसतो. वीज संकटावर मात करण्यासाठी रुफ टॉप सोलर योजना उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात २ हजार २३० वीज ग्राहकांनी घराच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसवून वीजनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.
या ग्राहकांनी महिनाभरात २१ लाख ३००९ युनिट वीज निर्मिती करत वीजबिलातून मुक्ती मिळवली. तसेच निम्मी वीज महावितरणला विक्री करून उत्पन्नही मिळवले.
केंद्र सरकारतर्फे छतावर सोलर पॅनल बसवणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते. सोलर पॅनलद्वारे रोज १ ते ८ किलोवॉट वीजनिर्मिती करता येते. जिल्ह्यात २ हजार २३० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांनी सौरऊर्जा पॅनल बसवले आहे. या माध्यमातून वर्षभरात २ कोटी ५२ लाख ३६ हजार १०८ युनीट वीज निर्मिती झाली.
सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. तीन किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार खर्च येतो व त्यामध्ये अंदाजे ४८,००० रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळते. त्यामुळे ग्राहकाला जवळपास ७२,००० रुपये खर्च येतो. सौर ऊर्जेमुळे पर्यावरण रक्षणाला मदत होते तसेच ग्राहकांना आर्थिक लाभ होतो.
विभागनिहाय ग्राहक व वीज निर्मिती (युनिटमध्ये)
अहमदनगर ग्रामीण – १३७ – १०९७०७
अहमदनगर शहर – १०५१ – ११९६८८९
कर्जत विभाग – ६३ – ३११६८
संगमनेर विभाग – ६६७ – ५७९७८१
श्रीरामपूर विभाग – ३१२ – १८५४६४
अहमदनगर शहर विभागात सर्वाधिक सौर पॅनल
जिल्ह्यात वीज कंपनीचे तीन विभाग आहे. अहमदनगर शहर विभागात सर्वाधिक १०५१ ग्राहकांनी सौरऊर्जा पॅनल बसवले आहे. या पॅनलमधून ११ लाख ९६ हजार ८८९ युनिट विजेची निर्मिती महिनाभरात झाली. संगमनेर विभागात ६६७ ग्राहकांनी पॅनल बसवले आहे. त्यातून ५ लाख ७९ हजार ७८१ युनिट वीज निर्मिती झाली. श्रीरामपूर विभागात ३१२ ग्राहकांकडे सोलर सिस्टीम आहे. त्यातून १ लाख ८५ हजार ४६४४ युनिट वीज निर्मिती झाली.
सोलर पॅनेलचा खर्च पाच वर्षांत निघतो
सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. सोलर पॅनेल बसवण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे.
-दीपक लहामगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता,महावितरण.
असे मिळते अनुदान
तीन किलोवॅटपर्यंत सोलर पॅनेल बसवल्यावर ४० टक्के, १० किलोवॅटपर्यंत २० टक्के सबसिडी मिळते. दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी साधारण एक लाखापर्यंत खर्च अपेक्षित असतो. त्यावर ४० टक्के सबसिडी मिळते. घरगुती सोलर पॅनल बसवताना घरात किती वीज लागते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. घरात २ ते ३ पंखे, एक फ्रिज, ६ ते ८ एलईडी, एक पाण्याची मोटर आणि टीव्ही आदी उपकरणासाठी दिवसांत ६ ते ८ युनिट वीज लागते.