भाळवणी येथील एमआयडीसी मधील एका नामांकित कंपनीत गॅसची मोठ्या प्रमाणावर वायुगळती
अहिल्यानगर - जिल्हा प्रतिनिधी, संगीता खिलारी

भाळवणी येथील एमआयडीसी मधील एका नामांकित कंपनीत गॅसची मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला आहे.
परंतु कंपनी प्रशासनाने हा प्रकार दाबला असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर वायुगळती होऊनही आमच्या ठिकाणी वायू गळती झालीच नाही असा कांगावा करत हे प्रकरण दाबले आहे. कंपनी प्रशासनाने आपल्या पातळीवर ही गॅस वायुगळती रोखली असुन कंपन्या कामगारांच्या व स्थानिक रहिवाश्यांच्या जीवाशी तर खेळत नाही ना ? असा सवाल व्यक्त होवू लागला आहे.
दोन दिवसापूर्वी (रविवारी) भाळवणी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस वायुगळती झाल्याची तक्रार थेट जिल्हाधिकारी कार्याकडे स्थानिक रहिवाशांनी केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार यांना या संबंधीची कल्पना देत तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी भाळवणीचे मंडल अधिकारी पी.एच उचाळे व कामगार तलाठी दिपक गोरे यांना घटनास्थळी पाठवून याची खातर जमा करण्यास सांगितले. तोपर्यंत या बड्या कंपनीतील प्रशासनाने ही गॅस वायुगळती थांबवून उपाययोजना केली होती.
वायु गळती कोणत्या कंपनीत झाली, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर अनेक कंपन्याकडे महसुल प्रशासनाने चौकशी केली असता सर्वांनीच आमच्या कंपनीमध्ये गॅस वायुगळती झाली नसल्याचे सांगितले.
भाळवणी येथील औद्योगिक वसाहतीचा विस्तार वाढत चालला असून अनेक नवनवीन कंपन्या दाखल होऊ लागल्या आहेत. परंतु या कंपन्यांचे प्रशासन बेफिकीरपणे कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक नामांकित पाईप कंपन्या, प्लास्टिक कागद निर्मिती, स्टील उत्पादन, अॅल्युमिनियम फ्रेम उत्पादन, गादी कंपन्या सह इतर अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. पारनेर तालुक्यात सुपा व भाळवणी या ठिकाणी औद्योगिक वसाहत असून आग लागल्यास किंवा गॅस गळती झाल्यास कोणत्याही प्रकारची अग्निशमन किंवा गॅस प्रतिबंधक योजना तालुक्यामध्ये कार्यरत नाही. त्यामुळे थेट नगर येथील अग्निशामक दलाचा आधार सुपा व भाळवणी येथील ठिकाणच्या कंपनी मालकांना घ्यावा लागतो.
गॅस वायुगळतीची तक्रार थेट जिल्हाधिकार्यांकडे – भाळवणी येथील औद्योगिक वसाहती मधील एका नामांकित कंपनीमध्ये गॅस वायुगळती झाली असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी आदेश देताच आम्ही औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये जाऊन चौकशी केली. स्थानिक रहिवाशांनी काही काळ वास येत असल्याची तक्रार आमच्याकडे केली होती. परंतु कंपन्यांमध्ये चौकशी केली असता आमच्याकडेही गॅस गळती झाली नसल्याचे आम्हाला सांगितले.
त्या नामांकित कंपनीत दुसर्यांदा गॅस गळती..
भाळवणी येथील औद्योगिक वसाहती मधील एका नामांकित कंपनीत या अगोदर सुद्धा गॅस वायुगळती झाली होती. त्यानंतर रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा गॅस वायुगळती झाली असून कंपनी प्रशासन मात्र कामगारांशी व स्थानिक रहिवाशांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व औद्योगिक वसाहत कार्यालय या कंपनीवर कारवाई करणार का ? असा सवाल कामगार व ग्रामस्थ करू लागले आहे.