पुणे विद्येचे माहेरघर कायमच राहिले, पण सोलापूर उद्योगांचे राहिले नाही – शरद पवार
सोलापूर

एक काळ असा होता की, पुणे विद्येचे आणि सोलापूर औद्योगिक क्षेत्राचे माहेरघर होते. कालांतराने चित्र बदलले. पण पुणे विद्येचे माहेरघर कायमच राहिले.
सोलापुरातील गिरण्या मात्र संपुष्टात आल्या, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी येथे म्हणाले. सोलापूरच्या औद्योगिक पीछेहाटीवर त्यांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे भाष्य केले.
आता औद्योगिक क्षेत्रातील पुढारपणासाठी आयटी क्षेत्रात निश्चित असे काम करावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिले.
सलगरवाडीतील सोलापूर आयटी पार्कचे भूमिपूजन रविवारी सकाळी त्यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.
पुणे आणि सोलापूरच्या प्रगतीची तुलना करत त्यांनी सोलापूरच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. ‘औद्योगिक क्षेत्रात पुण्याने प्रचंड बदल केले. आयटीच्या माध्यमातून देशाचा आणि देशाबाहेरील कंपन्यांचा संबंध येतो, त्यात पुण्याने स्थान मिळवले आहे.
सोलापूरचे नाव एकेकाळी वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठे होते. त्या वेळी मी सोलापूरचा पालकमंत्री होतो. त्या काळात किर्लोस्करांचे एक युनिटही कार्यरत होते. त्याची काळजी घेण्यासाठी किर्लोस्कर कुटुंबातील एक व्यक्ती नेमलेली असायची. त्यामुळे तो कारभार व्यवस्थित पार पडत होता.
माजी महापाैर महेश कोठे यांच्या मालकीच्या सलगरवाडी येथील २४ एकर जमिनीवर आयटी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीने या प्रकल्पाचे काम हातील घेतले.
दीड कोटीची देणगी सुपूर्द
आर्यन्स ग्रुपने भूमिपूजनाच्या दिवशीच ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर समितीला दीड कोटी रुपयांची देणगी दिली. पवार यांच्या हस्ते समितीकडे त्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. पवारांनी त्यांच्या भाषणात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचाही उल्लेख केला.
चिमणीमुळे कारखाना अडचणीत आलेला आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उजनीमुळेच ग्रामीण चित्र बदलले; उसाचे क्षेत्र वाढले, कारखाने आले
उजनी धरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीच चित्र मात्र बदलले. फळबागा आल्या, उसाचे क्षेत्र वाढले आणि कारखाने मोठ्या संख्येने सुरू झाले. त्याने ग्रामीण भागाचे चित्र पालटले. ऊस उत्पादन करणारे शेतकरी आणि कारखानदारी उभी करण्यासाठी प्रयत्न करणारे जाणकार सोलापुरात आले. त्याचा परिणाम असा दिसतो की, ग्रामीण भाग बदलतोय, सोलापूर शहरही बदलतेय.
अशा बदलत्या शहरात आयटी कंपन्या येणे चांगल्या प्रगतीचे लक्षण आहे. – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष