
छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या 7 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे.
पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हे कपड्याचे दुकान छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला होते.या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे.