
अहमदनगर – शेवगाव पोलिस ठाण्यातून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. त्यानंतर राबवलेल्या शोधमोहिमेत त्यास पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
मुज्जू ऊर्फ मुद्दसर साजीद सय्यद (वय १९, रा. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. शेवगाव शहरातील ईदगाह मैदान येथे दोन गटांत हाणामारी झल्याची घटना शुक्रवारी (ता.२२) घडली होती. याबाबत एका गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातील परवेज मेहबूब शेख, मुज्जू ऊर्फ मुद्दसर साजीद सय्यद, अरमान ऊर्फ सर्फराज गणी पिंजारी या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.
शनिवारी वैद्यकीय तपासणीसाठी या तिघांना पोलिसांच्या वाहनातून गेवराई रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे परवेज शेख यास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तो खाली पडला. याचा फायदा घेत यातील आरोपी मुज्जू सय्यद याने पोलिसांच्या तावडीतून धूम ठोकत बाजरीच्या शेतात लपून बसला.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे हे तातडीने तेथे फौजफाट्यासह दाखल झाले.
त्यांनी राबविलेल्या शोधमहिमेत ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील बाजरीच्या पिकात आरोपी लपून बसल्याचे निर्दशनास येताच पोलिसांनी त्यास पकडले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मारुती सानप यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.