
राज्यातील सरकार स्थिर असून पूर्ण बहुमतात आहे. इतकेच नाही तर आमच्यासोबत येण्यासाठी आणखी 10 आमदारांची यादी तयार आहे, असा दावा भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंद यांच्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवतील असा दावा विरोधक करत आहेत. त्या नंतर भाजपचा ‘बी प्लॅन’ तयार आहे का? असा प्रश्न भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते बोलत होते.
भाजप प्रदेश अध्यक्ष आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तयांच्या बैठका घेत आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निष्णात वकील आहेत. विधानसभेच्या परंपरा, पद्धती व निकालाचे पालन करून ते योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे भाजपला बी प्लॅनची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यातील सरकार भक्कम असून 225 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला.
‘महाविजय-2024’ अभियाना अंतर्गत ‘घरघर चलो’
भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्ट्रीने तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा नगर जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ‘महाविजय-2024’ अभियाना अंतर्गत ‘घरघर चलो’ यात्रेची सुरुवात नगर शहरातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.