मुंबई – ओबीसी समाज आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत
मराठा आंदोलन सुरू असतानाच रस्त्यावर उतरण्याची घोषणा,13 सप्टेंबरपासून अन्नत्याग

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने शर्तीचे प्रयत्न सुरू असतानाही हे आंदोलन अद्याप संपलेले नाही. तर दुसरीकडे आता ओबीसी समाजाने देखील रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे.
ओबीसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत असून, ओबीसी समन्वय समितीने यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
बुधवार 13 सप्टेंबरपासून या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून त्यामुळे राज्य सरकाची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक छत्रपती संभाजीनगरमधील संत सावता महाराज मंदिरात पार पडली. ओबीसी समन्वय समितीच्या वतीने माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधील समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची या बैठकीत भाग घेतला होता.
या बैठकीत सदरील आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आंदोलन क्रांतीचौकात करण्यात येणार आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या अशा…
मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये.
सर्व जातीची जातनिहाय जन- गणना त्वरित करावी
आजतागायत मराठा समाजाला कुणबी (ओबीसी) म्हणून दिलेली जातींची प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
ओबीसी, (व्हिजेएनटी, एसबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी
ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ती त्वरित चालू करावी
सरकारी उद्योगांचे खासगीकरण थांबून सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा अध्यादेश तत्काळ रद्द करण्यात यावा
ओबीसींचे आरक्षण कमी करणार नाही – मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलनात त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
मात्र, इतर कोणत्याही समाजाचा आरक्षण कमी न करता हे आरक्षण दिले जाणार आहे. दोन समाजात वाद होईल असे कोणतेही निर्णय घेतले जाणार नाही. आबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.