
पंढरीची वारी म्हटलं, की वारक-यांच्या मनाला पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे वेध लागतात. हा सोहळा म्हणजे स्वयंशिस्तीची पाठशाळाच असते. कोणाचं आमंत्रण नाही, निरोप नाही की साधी जाहिरात नाही. तरीही विठ्ठलभक्तीची आस मनात ठेवून मोठ्या संख्येने वारकरी एकत्र येतात. वाटचाल करतात आणि सुखदु:खाच्या गुजगोष्टी करीत प्रवासही पूर्ण करतात.
वारी म्हणजे वारंवारिता ज्यात असते, ज्यात सतत फेऱ्या मारणे असते ती वारी. भौतिकातून अभौतिकात, लौकिकातून अलौकिकात, बहिरंगातून अंतरंगात, स्वार्थातून परमार्थात व देहभावातून देवभावात लीन-विलीन होण्यासाठी जी, आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी-कार्तिकी पायी यात्रा होते तिला भागवतधर्मामध्ये ‘वारी’ असे म्हणतात.
वारी म्हणजे सातत्य, निरंतरता, अखंड करावयाची साधन.. तपस्या-साधना अनेक प्रकारांनी करता येते. ध्यानधारणा, योगसाधना, जपतपादी अनुष्ठान, मौनव्रत असे विविध मार्ग तपस्येचे असतात. ‘पंढरीची वारी’ ही सुद्धा एक, दिसायला सोपी व सुलभ; परंतु प्रत्यक्षात आचरण्याला फार कठीण अशी ‘उग्रकठोर तपस्याच’ असते. वारी म्हणजे फेरा. आपला जन्म-मरणाचा फेरा सुरूच असतो. ती जन्म-मरणाची वारंवार होणारी ‘वारी’ संपावी, दुःख-क्लेश, यातना, पीडा, भय, शोक, अतृप्ती यांनी डागळलेला मनुष्यजन्माचा फेरा सदासाठी बंद व्हावा, यासाठीच जी नैष्ठिक पदयात्रा केली जाते तिला ‘वारी’ असे म्हणतात.. वारी म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे खेचून नेणारा महामार्ग असतो! अंधारातून म्हणजे विकाररूप षड्रिपूंच्या विळख्यातून सोडवून भक्तीच्या प्रकाशात जी समाविष्ट करते ती वारी… संकल्प-विकल्पाची वारी’ बंद होण्यासाठी केली जाते ती वारी!
भागवतधर्माची भगवी पताका घेतलेले पताकाधारी, चोपदार, टाळकरी, मृदंगमणी, वीणेकरी, तुळस किंवा पाण्याची कळशी घेतलेल्या दिंडीतील महिला अशी दिंडीची साधारण रचना असते.
पालखी रथाच्या पुढे आणि मागे त्यांची ठरलेली जागा असते. आदर्श जीवनाचे महत्व विषद करणारी वारी म्हणजे संतबोधाचा जागर घडविणारे फिरते विद्यापीठ होय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
जय हरी माऊली👏