डॉ. विनायक काळे पुन्हा ससूनमध्ये, अधिष्ठातापदी नियुक्ती
पुणे - डॉ. काळे यांची जानेवारी महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती.

बी. जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत.
ते आज (गुरुवार) ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळे यांचे अवघ्या काही महिन्यातच ससूनमध्ये पुनरागमन होताना पाहायला मिळणार आहे.
डॉ. काळे यांची जानेवारी महिन्यात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाविरोधात डॉ. काळे यांनी मॅटमध्ये दावा दाखल होता.
१४ जुलै रोजी मॅटने डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला होता. या निकालाविरोधात डॉ. ठाकूर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या नंतर उच्च न्यायालयाने डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द ठरवली होती.
आता पुन्हा काळे यांना अधिष्ठाता करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने काढले आहेत.