दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिन’ म्हणून का साजरा करतात?

गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः
आपल्या संस्कृतीत आई-वडिलांनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
कोण होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये भारत सरकारने रशियातील भारताचा राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केली. तेथेही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. १९५२ मध्ये ते भारतात परतले, त्यानंतर १९५२ ते १९६२ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषविले. १४ मे १९६२ रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले.
१९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबही बहाल केला होता.
सर्वपल्ली यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा नामांकन मिळाले होते. १७ एप्रिल १९७५ मध्ये त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.
आज ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षकदिन.
शिक्षकांची आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची भूमिका असते, कारण ते आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर ते आपल्याला व्यावहारिकपणे येणाऱ्या आव्हानांसाठी जागरूक आणि तयार देखील करतात. याच गुरुंविषयी आदर, भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच ‘शिक्षक दिन’.