
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ३६ लाख ११ हजार ३३ इतके मतदार आहेत.
सर्वाधिक म्हणजे ३ लाख ५६ हजार ४७४ इतके मतदार शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात असून, सर्वात कमी म्हणजे २ लाख ५७ हजार ५१९ इतके मतदार अकोले तालुक्यात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२३ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ दरम्यान विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या अंतर्गत मतदारयादी अद्ययावत करण्यात आली. सर्व घटकांचा मतदारयादीत समावेश असावा, यावर विशेष भर देण्यात आला.
गावोगावी मतदारनोंदणी मोहीम राबविण्यात आली. यापूर्वी प्रारुप यादीही प्रसिद्ध करण्यात आली. आता अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यात एकूण ३६ लाख ११ हजार ३३ इतक्या मतदारांचा समावेश झाला आहे. १८ लाख ७३ हजार ७६९ पुरुष तर १७ लाख ३७ हजार ६७ महिला मतदारांचा समावेश आहे.