
राहता तालुक्यातील (जि. अहमदनगर) शिर्डी जवळच्या सावळीविहीर येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) नवी वसाहत निर्माण करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
त्यामुळे शेती महामंडळाच्या 502 एकर जमीनीवर रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे असलेल्या सलग आणि समतल जमिनीचा सुयोग्य वापर करताना त्यावर औद्योगिक विकास क्षेत्र निर्मितीसह रोजगार वाढीस चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु. आणि सावळीविहीर खु. तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे शेती महामंडळाच्या 502 एकर जमीनीचा सुयोग्य वापर होणार आहे. ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास विनामूल्य हस्तांतरीत करावी किंवा प्रचलित मूल्यानुसार संपूर्ण रक्कम आकारण्यात यावी याबाबत मंत्री महसूल, उद्योग आणि मुख्य सचिव हे निर्णय घेतील.
तसेच या औद्योगिक क्षेत्रास ग्रूप ड प्लस औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्याबाबत उद्योग विभागाने नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
नवीन एमआयडीसी उभारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेले ठिकाण शिर्डी शहरापासून पाच कि.मी., समृध्दी महामार्गाच्या इंटरचेंजपासून केवळ 3 कि.मी. तर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 14 कि.मी. अंतरावर आहे. रेल्वेमार्ग, रस्तेमार्ग तसेच हवाईमार्गाने देशभरातील सर्व प्रमुख शहरांना अत्यंत सुलभतेने जोडणारी औद्योगिक वसाहत म्हणून भविष्यात उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.
सहकार पंढरी म्हणुन नावलौकीक असलेले प्रवरानगर, साईबाबांची पावनभूमी असलेली शिर्डी तिर्थक्षेत्र आता उद्योग नगरी म्हणून परिसराचा नावलौकीक होण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.