
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या सोमवारी (११ सप्टेंबर) विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी ११.३० ते दुपारी २.३० या वेळेत ही विशेष सभा होईल. अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार लाॅबिंग सुरू केली आहे.
मात्र, ऐनवेळी चिठ्ठी काढून अध्यक्षांची निवड करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सर्व संचालकांनी अध्यक्ष नितीन पाटील यांच्याविरोधात तक्रार देऊन त्यांना पदमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्याला महिना उलटल्यानंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे.
मंत्री, बँकेचे संचालक अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, संचालक अंबादास दानवे यांच्यासह अन्य संचालकांनी नितीन पाटील यांचे अधिकार काढून घेण्यासाठी कार्यकारी संचालक व उपाध्यक्षांकडे तक्रार दाखल केली. सर्वच संचालक विरोधात गेल्याचे पाहून पाटील हैराण झाले होते. त्यांनी एका ओळीत राजीनामा दिला. तेव्हापासून अध्यक्षाचे पद रिक्त झाले.
पाटील यांचा राजीनामा सभेत एकमताने मंजूर करून तो सहनिबंधकांकडे पाठवण्यात आला होता. संचालकांमधून एकाची अध्यक्ष म्हणून निवड करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ११ सप्टेंबर रोजी बँकेच्या सभागृहात सकाळी ११.३० वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
संदिपान भुमरे यांच्या गुगलीकडे लक्ष
वैजापूरचे दिनेशसिंह परदेशी, जगन्नाथ काळे, जावेद खान, कृष्णा डोणगावकर, सुहास शिरसाठ यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस लागली आहे. सत्तार यांच्या मर्जीवरच अध्यक्ष कोण होणार हे अवलंबून असेल. गेल्या वेळी माघार घेणारे पालकमंत्री भुमरे या वेळी काय गुगली टाकतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आगामी निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून पाटील यांना हटवून नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी सर्व संचालक, पक्ष, गट-तट विसरून एकत्रित आले आहेत. त्यामुळे ऐनवेळी सर्वानुमते चिठ्ठी काढून अध्यक्षाचे नाव ठरवण्यात येईल, अशीही शक्यता आहे.
उमेदवारी अर्जांचे वाटप व स्वीकृती सकाळी : ११.३० ते दुपारी १२अर्जांची छाननी : दुपारी १२ ते १२.३०वैध अर्जांची यादी प्रसिद्धी : दुपारी १२.३०उमेदवारी अर्ज माघार : दुपारी १२.३० ते १अंतिम उमेदवाराची यादी जाहीर : दुपारी १मतदान प्रक्रिया : दुपारी २ ते २.३०निकाल : दुपारी २.३० अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम
आगामी निवडणुकांवर डोळा
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असते. जिल्ह्यातील शेतीच्या अर्थचक्रात जिल्हा बँकेचा मोठा वाटा आहे. शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने बँकेशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे जिल्हा बँक ताब्यात असणे निवडणुकीसाठी महत्त्वाचे मानले जाते.
येत्या २०२४ मध्ये लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाकडे पाहिले जात आहे.