
अहमदनगरमधील राजकारण वेगवेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे. वरती महायुती, महाविकास आघाडी असली तरी अहमदनगर जिल्ह्यात राजकारण वेगळेच सुरु आहे. भाजपमध्ये वरती मोठे स्थान निर्माण करणाऱ्या विखे यांना मात्र उत्तरेतच भाजपमधूनच मोठा विरोध होतोय.
भाजपचेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे विखेंच्या विरोधात काम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कट्टर राजकीय विरोधक असणारे बाळासाहेब थोरात यांच्याशी हातमिळवणी करत त्यांनी विखे याना राजकीय धक्का गणेश कारखान्याच्या निवडणुकीत दिला.
आता गणेश कारखान्याचा गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. त्यावेळी देखील दोघंनीजे राजकीय वक्तव्ये केली ते विखे यांना विरोध करणारीच होती. गळीत हंगामाचा प्रारंभ महंत नारायणगिरी महाराज व उपासनी कन्यास्थान आश्रमाच्या माधवीताई यांच्या हस्ते झाला यावेळी आ. बाळासाहेब थोरात, माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे, युवानेते विवेक कोल्हे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
आ. थोरात हे विखे यांचे राजकीय शत्रू असल्याचे सर्वश्रुत आहे. ते यावेळी म्हणले की, गणेश कारखान्याच्या मैदानात त्यांना आम्हीच गुगली टाकली आणि षटकारही आम्हीच ठोकला आहे.
आम्ही जे केलं त्यामुळेच त्यांना आता देवदर्शन, उसाचा हप्ता आणि पाच किलो साखर वाटप सुरू करावे लागल्याची टीका त्यांनी केली. तसेच सामान्यांच्या जीवनात समृध्दी आणू शकणाऱ्या गणेश कारखान्यात त्यांनी अडथळे आणून राजकारण करू नये अशीही टीका केली.
तसेच जिल्हा बॅंकेने गणेश कारखान्यास तब्बल चाळीस कोटी रुपये कर्ज मंजूर केले. साखर सहसंचालकांनी हे कर्ज रोखण्यासाठी पत्र दिले होते परंतु न्यायालयाने मात्र ते रद्द ठरविले आहे. आपण जिल्हा बॅंकेत आजवर कधीही राजकारण केले नाही पण सध्या ते सुरु झाले आहे असे ते म्हणाले.
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, कर्ज मंजूर झाले होते पण जिल्हा बॅंकेने मंजूर झालेले कर्ज रोखून धरवले, पण तरीही गणेश कारखाना सुरू झाला. ही एक मोठी गोष्ट असून इतिहासात देखील याची नोंद घेईल. ज्यांनी पहिला साखर कारखाना स्थापन केला त्यांचे वारसदार सहकार मोडीत काढत असल्याची टीका त्यांनी केली.
चर्चांना उधाण
दोन्ही दिग्गजांच्या या वक्तव्यानंतर विखे यांनी कर्ज रोखून धरले का? किंवा ते सद्य संचालकांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतात का? याची चर्चा सुरु झाली. विशेष म्हणजे असे करूनही कारखाना सुरु केला म्हणजे हा विखेंनी गुगली टाकली पण थोरात-कोल्हेंनी एकत्र येत षटकार लगावला असं काहीस झालं आहे का? अशाच चर्चा सध्या रंगल्या आहेत.