उंच इमारतीच्या बाल्कनीतून पडून ‘थ्री इडियट्स’ फेम अभिनेत्याचे निधन
मुंबई

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन झाले.
आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’मध्ये लायब्रेरियन दुबे ही त्यांची भूमिका विशेष चर्चेत आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा अखिल यांची पत्नी आणि अभिनेत्री सुझान बर्नर्ट शूटिंगसाठी हैदराबादमध्ये होती. ही बातमी ऐकून ती तातडीने परतली.
मिळालेल्या माहितीनुसार ५८ वर्षीय अभिनेते बाल्कनीजवळ काम करत होते, तेव्हा ते उंच इमारतीवरून खाली पडले. दरम्यान अभिनेत्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेनंतर पार कोलमडून गेलेल्या अभिनेत्री सुझानने अशी प्रतिक्रिया दिली की, ‘माझं हृदय तुटलं आहे, माझा एक भाग निघून गेला आहे’.
अभिनेत्रीला अखिल यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करावी लागत आहे. अखिल यांची अशाप्रकारे एक्झिट तिच्यासाठी खूप मोठा धक्का आहे.
अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांची ‘लायब्रेयियन दुबे’ ही भूमिका विशेष गाजली. आजही त्यांच्या ‘परमनंट हूँ सर’ या संवादावर अनेक मीम्स व्हायरल होतात. त्यांनी ‘डॉन’, ‘वेल डन अब्बा’, ‘हजारों ख्वाहिशे ऐंसी’ या सिनेमातही काम केले आहे.
दरम्यान या व्यतिरिक्त त्यांनी ‘भंवर’, ‘उतरन’ (उमेद सिंग बुंदेला), ‘उडान’, ‘सीआयडी’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भारत एक खोज’, ‘रजनी’ आणि इतर अनेक टीव्ही शोमध्ये काम केले होते.