शेअर मार्केटमध्ये नफ्याचं आमिष..अहिल्यानगरच्या चौघांची तब्बल ५० लाखांची फसवणूक
अहिल्यानगर

शेअर मार्केटमध्ये झटपट नफा आणि आकर्षक परताव्याच्या मोहजाळ्यात गुंतवणूकदारांना अडकवणाऱ्या टोळीचा आणखी एक मोठा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील चार गुंतवणूकदारांना तब्बल ५० लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अर्जुन लक्ष्मण गिते (वय ३६), जिल्हा न्यायालयातील लघुलेखक, हे यातील प्रमुख बळी ठरले आहेत.
२०२२ मध्ये एस.एस.वाय. शिबिरात त्यांची ओळख आरोपी विशाल तुकाराम चव्हाण व त्याची पत्नी शितल उर्फ पूजा चव्हाण यांच्याशी झाली. त्यांनी “व्ही.सी. इन्व्हेस्टमेंट” या नावाने मोठ्या परताव्याचे आश्वासन देत गिते यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले.
“३० ते ४० टक्के नफा हमखास मिळतो,” असे सांगून त्यांनी गिते यांच्याकडून नोव्हेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात टप्प्याटप्याने २५ लाख ५० हजारांची गुंतवणूक करून घेतली. प्रारंभी थोडेफार परतावे देत विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, काही महिन्यांनी सर्व देयके थांबली.
करारनाम्यापासून प्लॉटपर्यंत पण पैसे नाहीच
मार्च २०२५ मध्ये चव्हाण यांच्याकडून गिते यांच्यासोबत नोटरीकृत करारनामा करण्यात आला. त्यात एप्रिल २०२५ पर्यंत संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
पण मुदत संपली तरी पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर आरोपींनी कृष्णा दगडु शिंदे यांच्या माध्यमातून निंबोडी गावातील प्लॉट विकून रक्कम परत करतो असे सांगितले. पण तो व्यवहारही पूर्ण झाला नाही.
एकूण किती लोक फसले?
फिर्यादी गिते यांच्यासह —
अर्जुन गिते : २५.५० लाख रुपये
शितल संदीप चव्हाण : १३ लाख रुपये
आनंद सुरेंद्र जोशी : ५ लाख रुपये
अजिनाथ आबासाहेब पाडळकर : ७ लाख रुपये.. अशा मिळून ५० लाख ५० हजार रुपयांची रक्कम बुडविण्यात आली.
याशिवाय, आरोपींनी नगर व लातूर जिल्ह्यातील ४० ते ५० इतर गुंतवणूकदारांचीही फसवणूक केली असून, एकूण रकमेचा आकडा कोट्यवधींमध्ये जात असल्याचा अंदाज आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी विशाल चव्हाण आणि कृष्णा शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे पुढील तपास करत आहेत.