
नगर तालुक्यातील खांडके ग्रामपंचायतमध्ये सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने केलेला आर्थिक गैरव्यवहार चौकशीत सिध्द झाल्याने नाशिक विभागीय आयुक्तांनी सरपंच पोपट सोन्याबापू चेमटे यांचे पद रद्द केले आहे. तर ग्रामसेवक दत्तात्रय विश्वासराव गर्जे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी यापूर्वीच निलंबित केले असल्याची माहिती तक्रारदार किरण यमाजी चेमटे यांनी दिली आहे.
गावातील ग्रामस्थ किरण चेमटे व इतरांनी मागील वर्षी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या कडे नगर तालुक्यातील खांडके ग्रामपंचायत मध्ये सरपंच, ग्रामसेवक यांनी पदाचा गैरवापर करुन केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार करत सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. फर्निचर खरेदीसाठी धनादेश काढून देखील ते आणलेले नाही.
तसेच लालपुर विन्ड वर्ल्ड (पवणचक्की) या कंपनीचा कर रुपाने आलेला ६ लाख ७२ हजार रुपयांचा धनादेश परस्पर खाते उघडुन त्या पैशांचा अपहार केलेला आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी मागणी केलेल्या कामांचे स्टेटमेंट न देता ग्रामसेवकांनी सतत उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहे.
तसेच सन २०२० ते २०२२ या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या खात्यांमधून अंगणवाडी एल.ए.डी. साठी, समाज मंदिरासाठी एल.ए.डी. ग्रामपंचायत खात्यातून रक्कम काढुन अद्याप पर्यंत वस्तु आणलेल्या नाहीत.असे या तक्रारीत म्हंटले होते.
तसेच जमा केलेली घरपट्टी व पाणीपट्टी रक्कम ग्रामनिधी मध्ये न भरता परस्पर पैसे खर्च केलेले आहेत. फेब्रुवारी २०२१ ते जून २०२२ पर्यंत ग्रामपंचायतीने कोणतेही विकासत्मक काम केलेले नाही. वेळोवेळी विनंती करुनही गावातील विकास कामे न करता, मनमानी कारभार करुन परस्पर निधी लाटण्याचा प्रयत्न केलेला दिसुन येतो . १४ वा वित्त आयोग व १५ वा वित्त आयोग या पैशांचा खर्च कामासाठी न करता, परस्पर कामामध्ये बदल करुन निधी लाटण्याचा प्रयत्न केला आहे . त्याचबरोबर २०२०-२१ मध्ये १५ वा वित्त आयोगातील मंजूर कामे या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात येऊन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती.
या तक्रारीची गांभिर्याने दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, बांधकाम विभागाचे अभियंता भोसले, राऊत आदींच्या पथकाने केलेल्या या चौकशीत तक्रारदाराने केलेले आरोप सिध्द झाल्याने येरेकर यांनी ग्रामसेवक दत्तात्रय विश्वासराव गर्जे यांना निलंबित केले होते.
तर सरपंच पोपट सोन्याबापू चेमटे यांचे पद रद्द करण्याबाबतची शिफारस नाशिक विभागीय आयुक्तांकडे केली होती. यावर विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेवून सरपंच चेमटे यांचे पद रद्द केले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त उज्ज्वला बावके- कोळसे यांच्या यांनी याबाबतचे आदेश नुकतेच पारित केले असल्याचे तक्रारदार किरण चेमटे यांनी सांगितले. या प्रकरणात चेमटे यांना भगवान ठोंबे, बाळासाहेब चेमटे, संतोष मचे, संभाजी चेमटे आदींनी सहाय्य केले.