
नगर अर्बन को ऑप मल्टीस्टेट बॅंकेच्या कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात अटक केलेला सनदी लेखापाल तथा बँकेचा माजी तज्ज्ञ संचालक शंकर घनश्यामदास अंदानी (४५) याला गुरुवारी न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
बँकेचे तत्कालीन दिवंगत अध्यक्ष, दिलीप गांधी यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या मनसुख मिल्क प्रॉडक्ट्स व बँकेचे कर्जदार पटियाला हाऊस अशा दोघांशी अंदानी याचे झालेले ८ लाखांचे व्यवहार संशयास्पद असल्याने अधिक तपासाची आवश्यकता पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात मांडली.
अर्बन बँकेच्या घोटाळ्यात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह तिघा माजी संचालकांचा त्यामध्ये समावेश आहे. माजी संचालक व बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक संदीप मिटके या गुन्ह्याचा तपास करत आहेत. शहरातील ५८ आरोपींच्या मालमत्तांची माहिती संकलित करत असून, माहिती मिळताच पुढील कारवाई करणार असल्याचेही त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले.