मनपा कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च अखेर तिसऱ्या दिवशी थांबला
अहमदनगर - उपमुख्यमंत्री पवार घेणार मंत्रालयात १० ऑक्टोबरला बैठक.

मनपाच्या कामगार संघटनेने सुरू केलेला नगर ते मुंबई लाँग मार्च अखेर तिसऱ्या दिवशी (बुधवारी) दुपारी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे थांबला. शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन कामगारांच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या १० ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक आयोजित केल्याने मनपा कामगार संघटनेने लाँग मार्च स्थगित केला.
सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा, तसेच सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी मिळावी, या मागण्यांसाठी मनपा कामगार संघटनेने गांधी जयंतीदिनी ‘चलो मुंबई’ अशी हाक देत लाँग मार्च सुरू केला होता. सोमवारी निघालेला हा मोर्चा नगर-कल्याण महामार्गाने नेप्ती-जखणगाव मार्गे मंगळवारी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे पोहोचला.
मात्र, आ. जगताप यांच्यासह उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, नगरसेवक अविनाश घुले, माजी नगरसेवक आरिफ शेख, अशोक साबळे, परिमल निकम आदींनी कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस अनंत वायकर व अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. मुंबईला १० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने लाँग मार्च थांबवण्याचे आवाहन आमदार जगताप यांनी केले. त्यास त्यांनी प्रतिसाद देत लाँग मार्च थांबवला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब मुदगल, बलराज गायकवाड, विठ्ठल उमाप, गुलाब गाडे व कर्मचारी उपस्थित होते. लाँग मार्च थांबल्याने महापालिका प्रशासनाने मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत १० ऑक्टोबरला मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक होणार आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसह सफाई कामगारांच्या वारसा हक्काची मागणी व मनपा आस्थापनावरील अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांचा आकृतीबंध मंजूर असतानाही न झालेली भरती, अशा तीन विषयांवर या बैठकीत चर्चा व निर्णय होणार आहे.
कर्मचारीही शहराचे नागरिक
कर्मचारी हे नगर शहराचे नागरिक आहे. त्यांच्या हक्काचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन दिवस मंत्रालय येथे जाऊन बैठकीचे आयोजन केले. महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शासनाकडे प्रस्तावाचा पाठपुरावा वेळेवर झाला नाही. या गोष्टीला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.
तर पुन्हा लाँग मार्च काढणार युनियनचा इशारा
शहरातील नागरिकांचे प्रश्न थांबू नये. तसेच दैनंदिन साफसफाईचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. यासाठी लाँग मार्च थांबवण्याची विनंती केल्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी एकमुखाने पाठिंबा देत आमदार संग्राम जगताप यांच्यावर विश्वास ठेवत लाँग मार्च थांबवला. आयुक्त यांनी देखील कामावर हजर होण्याची विनंती केली. कामगार संघटनेचे अध्यक्ष लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्राचे वाचन केले. तसेच आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा लाँग मार्च काढू, असा इशारा दिला.