भूमी अभिलेख विभागाकडून ४० रोव्हर यंत्राद्वारे जमिनींचे ५७०० प्रकरणे निकाली
अहमदनगर

जमिनींच्या बांधांवरुन भाऊबंदकीत गावोगावी होत असलेले तंटे आता कमी होणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयाने उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंग लहरीद्वारे रोव्हर यंत्राच्या माध्यमातून जमीन मोजणी सुरू केली आहे. गेल्या सात महिन्यांत नगर जिल्ह्यातील खासगी व सरकारी १५ हजार हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनीची मोजणी केली आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली जमीन मोजणीची तब्बल ५ हजार ७०० प्रकरणे निकाली काढली आहेत.
खाजगी शेत जमीनीची मोजणी यापूर्वी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमार्फत पट्टीद्वारे मोजून केली जात होती.यासाठी मोठा कालावधी लागायचा. त्यासाठी नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. त्यानंतर ईव्हीएस यंत्राद्वारे जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र त्यातही अडथळे येत होते. आता मात्र जमिनीची अचूक मोजणी करण्यासाठी अत्याधुनिक रोव्हर यंत्र भूमि अभिलेख कार्यालयाला मिळाल्याने कमी वेळात अधिक क्षेत्राची मोजणी केली जात आहे. नगर जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाला ४० रोव्हर यंत्र मिळाले असून, गेल्या सात महिन्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्राची मोजणी या यंत्राद्वारे झाली आहे.
ऑनलाइन अर्जामुळे नागरिकांचा वेळ वाचणार
शेत जमिनीच्या मोजणीसाठी ई- मोजणी व्हर्जन २.० हे विकसित करण्यात आले असून, नागरिकांना सिटीजन पोर्टलच्या माध्यमातून घरात बसून ऑनलाईन मोजणी शुल्क भरून जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांना जमीन मोजणीच्या अर्जासाठी भूमी अभिलेख कार्यालयात येण्याची आवश्यकता लागणार नाही.
५९६२ जुन्या प्रकरणाची जमीन मोजणी पूर्ण
जमीन मोजणीचे अनेक प्रकरणे भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित होती. रोव्हरच्या माध्यमातून मोजणी सुरू केल्याने ही प्रकरणे निकाली निघाली . आतापर्यंत ५ ७०० प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात ५ ९६२ जुन्या प्रकरणाची जमीन मोजणी पूर्ण झाली आहे. रोव्हरद्वारे होणाऱ्या मोजणीमुळे नागरिकांचा वेळ वाचत आहे.
– सुनील इंदलकर, जिल्हा अधीक्षक , भूमी अभिलेख कार्यालय.
सरकारी रस्त्यांची रोव्हर यंत्राद्वारे मोजणी
यापूर्वी रस्त्यांचे रुंदीकरण अथवा नवे रस्ते निर्माण करण्यासाठी करावी लागणारी मोजणी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तारेवरची कसरत करावी लागत होती. आता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेली रस्ते तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाअंतर्गत असलेले रस्त्यांची तसेच नव्या भूसंपादनाची मोजणी ही रोव्हर यंत्राद्वारे केली जात आहे. त्यामुळे कामांना आणखी वेग आला आहे.