
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमात अमित शहा हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमामुळे मुंबई विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या गणेशोत्सव काळातील सुट्टया रद्द करून त्यांना कामावर बोलावण्यात आले आहे. तसे परिपत्रकच मुंबई विद्यापीठाने काढले आहे. मात्र, या निर्णयाला आता ठाकरे गटाच्या युवासेनेने जोरदार विरोध केला आहे.
युवासेनेची कुलगुरुंकडे तक्रार
गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी पूर्वसूचना देऊन ज्या कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेतली आहे. त्यांना कामावर बोलवू नये. त्यांची सुट्टी मंजूर करावी, अशी मागणी युवासेनेतर्फे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. युवासेनेच्या वतीने माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शीतल शेठ यांनी यासंदर्भात कुलगरूंची भेट घेत या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
गणेशोत्सवामध्येच कार्यक्रम का?
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात युवासेनेने म्हटले आहे की, विद्यापीठातील बहुतेक कर्मचारी कोकणात राहणारे असून गणेशोत्सवानिमित्त अनेकजण आपल्या मूळगावी जात असतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील नामवंत मंडळांच्या गणपतीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामध्येच हा कार्यक्रम घेऊन फक्त विद्यापीठाचे कर्मचारीच नाही तर सर्वसामान्य जनतेलाही वेठीस धरले जात आहे. हा प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी मूळगावी जाण्याकरिता पूर्वसूचना देऊन सुट्टी घेतली आहे. त्यांची सुट्टी मंजूर करावी.
गैरहजर न राहण्याच्या सूचना
मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबई विद्यापीठाच्या सर कावासजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत केंद्रीय मंत्री अमित शहा ‘सहकार’ या विषयावर बोलणार आहेत. शहा हे विद्यापीठात येणार असल्याने ऐन गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच 20 ते 23 सप्टेंबर या कालावधीत विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच कोणाही पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात अनुपस्थित राहू नये, असे परिपत्रकच मुंबई विद्यापीठाने काढले आहे. मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध करत युवासेनेने म्हटले आहे की, गणेशोत्सवासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या घेतल्या व जे कर्मचारी कामावर हजर राहू शकले नाही. त्यांच्या सुट्ट्या विद्यापीठाने मंजूर कराव्यात. कर्मचाऱ्यांना असे वेठीस धरू नये.