विद्यार्थी कलावंतांना विविध कलांसाठी संधी, महोत्सवात आता भजन, भारूड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली सह लावणी
सोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवात यंदाच्या वर्षापासून सहा नवीन भारतीय लोककलांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केली. यामध्ये भजन, भारूड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली आणि लावणी या लोककला प्रकारांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये भारतीय लोककला प्रकारांचा समावेश करण्याची मागणी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे यांच्यासह विविध संघटनांनी केली होती. गुरुवारी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी युवा महोत्सवात समावेश असलेल्या विविध कला प्रकारांचा आढावा घेतल्यानंतर निर्णय जाहीर केला.
विद्यार्थ्यामधील कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी विद्यापीठाकडून युवा महोत्सव आयोजित केला जातो. त्यात वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होतात. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात एकूण २८ कला प्रकाराच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात वैयक्तिक, सामूहिक कलाप्रकारांचा समावेश आहे. यासाठी बक्षिसेही दिली जातात.
नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या विविध बाबींचा विचार करून भारतीय लोककला व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने या सहा कलाप्रकारांचा समावेश करण्याची घोषणा केली. यातील काही कलाप्रकार युवा महोत्सवात होते, मात्र मागील सहा वर्षांपासून युवा महोत्सवातून वगळण्यात आले होते. त्यामुळे आता युवा महोत्सवात कला प्रकारांची संख्या वाढली आहे, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
युवा महोत्सवात विद्यार्थी कलावंतांना २८ कला प्रकार सादर करण्याची संधी मिळते. यात प्रामुख्याने लोकनृत्य, एकांकिका, मूकनाट्य, समूह गीत, सुगम संगीत, शास्त्रीय गायन, वादन व नृत्य, चित्रकला, इंस्टॉलेशन, वक्तृत्व, वादविवाद, पथनाट्य आदी प्रकारांचा समावेश आहे.