दहा फुटी गणेशमूर्तींंच्या विसर्जनास मनाई,गणेश मंडळांमध्ये नाराजी, दुसरा पर्याय द्यावा
मुंबई

मुंबई किनारा मार्ग प्रकल्पातील पुलाचे काम सुरू असल्याने वरळीतील गणेश घाटात (लोट्स जेट्टी) विसर्जन करताना भरतीवेळी दहा फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींमुळे पुलाच्या कामात समस्या निर्माण होऊ शकते.
त्यामुळे वरळीतील गणेश घाटात दहा फुटांपेक्षा उंच मूर्तींच्या विसर्जनास किनारा रस्ता प्रकल्प आणि मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे वरळीसह लोअर परळ आदी भागांतील गणेश मंडळांमध्ये नाराजी पसरली आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही पालिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पालिकेने विसर्जनासाठी दुसरा पर्याय द्यावा, अन्यथा दहा फुटांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटातच करणार, असा इशारा समितीने दिला आहे.
वरळी, लोअर परळ आदी जवळपासच्या भागातील छोट्या-मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन वरळीतील गणेश घाटात (लोटस जेट्टी) होते. मात्र, यंदा हे विसर्जन होऊ शकत नसल्याने वरळी, लोअर परळ भागांतील गणेश मंडळांसमोर समस्याच निर्माण झाली आहे.
सध्या मरिन ड्राइव्ह ते प्रियदर्शनी पार्क हा पहिला टप्पा, प्रियदर्शनी पार्क ते लोग्रो नाला हा दुसरा टप्पा आणि लोग्रो नाला ते वरळी सी लिंक अशा तीन टप्प्यांत मुंबई किनारा मार्गाचे काम होत आहे. यातील दोन टप्प्यात वरळीतील गणेश घाट (लोटस जेट्टी) येथे १८० मीटर लांबीच्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे.
पुलाच्या स्लॅबचेही काम सुरू असून, त्यामुळे अनेक यंत्रेही या ठिकाणी आणली आहेत. परिणामी या ठिकाणी उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेकडून मर्यादा घालण्यात आली आहे.
यानुसार, दहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार नाही, असे मुंबई किनारा मार्ग प्रकल्प आणि महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने निश्चित केले आहे.
यासंदर्भात गेल्या शुक्रवारी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि सार्वजनिक गणेशमंडळांच्या बैठकही पार पडली.
यावेळी दहा फुटांपर्यंतच्याच गणेशमूर्तींच्या विसर्जनास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत मुंबई किनारा मार्ग प्रकल्प प्रशासनाने मागणी केली.