
अहिल्यानगर सावेडी उपनगरातील सोनानगर चौक, बारस्कर मळा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर अहिल्यानगर शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे. एका पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार सुरू होता.
या कारवाईत पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि तंबाखूजन्य पदार्थ असा चार हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार हेमंत खंडागळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
आदिराज विलास दोमल (रा. बालिकाश्रम रस्ता, अहिल्यानगर), मोहम्मद सत्तार अन्सारी (रा. रांची, झारखंड, सध्या रा. दिल्लीगेट, अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावेडी उपनगरातील सोनानगर चौक, बारस्कर मळा येथे आदिराज दोमल हा अवैधरित्या हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती डॉ. टिपरसे यांना मिळाली होती. त्यांनी अंमलदार खंडागळे, महेश मगर, सागर व्दारके यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने बुधवारी (22 एप्रिल) सायंकाळी सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली.
आदिराज दोमल हा या हुक्का पार्लरचा मालक असून, तो बेकायदेशीरपणे हे केंद्र चालवत होता. छाप्यात मोहम्मद अन्सारी हा तरूण हुक्का पिताना रंगेहाथ मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून काचेचे पॉट, चिलीम, हुक्का पाईप, चिमटा आणि विविध कंपन्यांचे तंबाखूजन्य फ्लेवर्स असा मुद्देमाल जप्त केला आहे.




