सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मेसी राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ
शिरुर - शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट व पडीक जमिनी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी व डी. फार्मसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ शुक्रवार, दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला.
या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन कु. शिल्पा दिलीप गायकवाड (सरपंच, रामलिंग) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्रजी थिटे (अध्यक्ष, श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्था, शिरूर) हे होते.
यावेळी अरुण घावटे (आदर्श सरपंच, रामलिंग), नामदेव घावटे, विठ्ठल घावटे, यशवंत कर्डिले यांची विशेष उपस्थिती होती. तसेच प्रकाशशेठ धारिवाल (प्रसिद्ध उद्योगपती), पोपटराव दसगुडे (खजिनदार, रामलिंग ट्रस्ट), सचिन भाऊसाहेब घावटे (उपसरपंच, रामलिंग) यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्रजी थिटे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रम नसून सामाजिक जाणीव, जबाबदारी आणि शाश्वत विकासाची चळवळ असल्याचे सांगितले. युवकांनी श्रमसंस्काराच्या माध्यमातून गावाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संस्थेचे सचिव श्री. धनंजयजी थिटे व डॉ. हर्षवर्धनजी थिटे यांनी शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचे सामाजिक भान अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी) चे प्राचार्य डॉ. सचिन कोठावदे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. पाणलोट क्षेत्र विकास, पर्यावरण संवर्धन आणि पडीक जमिनींचे व्यवस्थापन या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.
तसेच सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी) चे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण विकसित होते, तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे व्यवस्थापक मा. श्री शिवाजी पडवळ, प्रा. विजया पडवळ व महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विद्या पाचरणे (कार्यक्रम अधिकारी, एनएसएस) यांनी केले.
या सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. दत्तात्रय रंगनाथ कुलट यांच्या प्रभावी शिवव्याख्यानाने शिबिराची प्रेरणादायी सुरुवात झाली.




