ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्रसामाजिक

संत ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानज्योत अखिल मानव जातीला महा ऊर्जेचे प्रेरणा स्त्रोत -लेखक प्रेरणादायी वक्ते – श्री दत्तात्रय वारकड

अहिल्यानगर

श्री संत ज्ञानेश्वर जन्म १३ व्या शतकात ११९७ इ.स.१२७५ मध्ये संभाजीनगर जिल्हयातील आपेगाव येथे झाला ते महान संत कवी होय.

श्री संत ज्ञानेश्वर यांना माऊली म्हटले जाते. माऊली यांनी संप्रदायात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला. माऊली यांनी ‘ हे विश्वची माझे घर ’! अशी विश्वव्यापक भावना केली आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली हे या विश्वाला लाभलेले एक अनमोल दागिना होय. माऊली यांनी आपले थोरले बंधू श्री निवृत्तीनाथ यांना गुरु स्थानी मानले. त्याकाळातील समाज व्यवस्था जाती धर्मावर आधारित होती. खालच्या जातीतील लोकांना वेद लिहिलेली संस्कृत भाषा समजत नव्हती. पुजारी जातीतील लोकांनी संस्कृत जाणल्यामुळे हा त्यांचा विशेष अधिकार समजला जात होता. जाती भेदामुळे खालच्या जातीतील लोकांना शहानपणा पासून वंचित रहावे लागे ही संकल्पना माऊली यांना मान्य नव्हती त्यांची गुरु थोरले बंधू श्री निवृत्तीनाथ यांनी माऊली यांना श्रीमदभगवत गीता या ग्रंथाचे सर्व सामान्यांना समजेल असे मराठी भाषेत रुपांतरीत करण्यास सांगितले तो रुपांतरीत ग्रंथ म्हणजे श्री ज्ञानेश्वरी – भावार्थ दीपिका होय.

श्री संत ज्ञानेश्वर यांनी तत्कालीन युगात रेड्या मुखी वेद वदन, मुक्ताईला पाठीवर मांडे भाजण्याकरीता तवा उपलब्ध करून दिला, सच्चिदानंद यांना जीवन दान दिले. चांगदेवांचा गर्वहरण करण्याकरिता चांगदेव पासष्टी चे लिखाण केले. अमृतानुभव ग्रंथ, हरिपाठ व पसायदानचे लिखाण केले. श्री संत ज्ञानेश्वर हे वैद्यानिक होते. समाजामध्ये अनेक प्रकारचे जाती ,धर्म ,पंथ जरी असले तरी मानव धर्म हाच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे .सर्व मानव समान आहेत व सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहेत हे बीज संत ज्ञानेश्वर माऊलींनी समाजामध्ये पटवून देण्याचे महान कार्य केले .समाजामध्ये स्वातंत्र्य ,समता ,बंधुत्व व ऐक्यता याची बीजे माऊलींनी समाजामध्ये रोवले.

संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वारकरी संप्रदाय ची भक्कम पाया उभारणी केले. भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्याकरिता माऊलींनी आपले आयुष्य वेचले .भागवत धर्माचे आचरण करून कोणीही ईश्वर प्राप्ती करू शकतो हे महत्त्वपूर्ण विचार समाजामध्ये माऊलींनी रुजवले. वारकरी संप्रदाय मधील वारी ही संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पूर्वीही होती कदाचित वारी हे पांडुरंग परमात्मा च्या उपासनेचा संप्रदाय म्हणजे वारी , वारी ही पांडुरंग परमात्मा इतकीच पुरातन असण्याची शक्यता आहे. मात्र ,श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या उपासनेच्या संप्रदायाला म्हणजे वारीला एक ऐश्वर्य व अढळता प्राप्त करून दिली.” ज्ञानदेव रचिला पाया l तुका झालासे कळस ll असे म्हटले जाते संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे मंत्र बनले. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी वयाच्या तेराव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका ग्रंथ लिहिण्याला प्रारंभ केला व वयाच्या सोळाव्या वर्षी हे महान कार्य पूर्ण केले .

इसवी सन 1290 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा नगरी येथे हे महान कार्य संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते पार पडले. नेवासा नगरी येथे असलेले पैस खांब या खांबाला टेकून संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ही ज्ञानेश्वरी लिहिली. भगवद्गीतेतील 18 अध्याय व 700 श्लोक यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये 9000 ओव्या मराठीमध्ये लिहिल्या ओवी ना ओवी स्पष्ट विश्लेषित मराठी मध्ये केले , पदाचे कोर न सांडे ज्ञानेश्वरी मध्ये कर्मयोग, भक्तीयोग , ज्ञानयोग याचे महत्त्व माउलींनी मराठी मधून विशद केले. स्वातंत्र्य , समता , बंधुत्व व ऐक्यता या मानवी मूल्यावर स्पष्टीकरण केले .

व्यावहारिक अध्यात्माचा एक साधा सोपा सुलभ मार्ग समाजाला उपलब्ध करून देणारी ज्ञानेश्वरी आज पावतो जनसामान्यांना उपलब्ध होत आहे . हे माऊलींनी अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक असे कार्य समाजासाठी करून ठेवले. ज्ञानेश्वरी या पवित्र व महान ग्रंथाने भारतीय संस्कृती आणि मराठी वाड्मयाकडे संपूर्ण विश्वाचे लक्ष वेधले गेले. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञान आणि भक्तीचे प्रतीक बनले आहे माऊलींचे ज्ञान म्हणजे पराकोटीची बुद्धिमत्तेचा परमोच्च साक्षात्कार होय. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे विद्यापीठ नेवासा नगरी हे होय.कारण संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी यासारखा पवित्र ग्रंथ व मराठी भाषेची माहिती सांगणारा अमृतानुभव हा ग्रंथ या दोन महान ग्रंथाची निर्मिती नेवासा नगरी येथे माऊलींनी केली आहे.

ज्ञानेश्वरी मध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांचे भाषा इतकी मधाळ गोड व मधुर आहे की त्या शब्दांची गोडी एकदा चाखली की कायमच अंतकरणात भिनत जाते , त्यांच्या मुखातून निघालेले शब्द सुगंधित होतात त्या शब्दांचा नाद मनामध्ये रुंजी घालतो .

त्यांच्या शब्दांचा स्पर्श जेव्हा कानाला होतो तेव्हा मन आपोआपच शांत होते .श्री ज्ञानदेवांच्या श्रीमुखातून आलेले शब्द हे सौंदर्य , रूप , रंग , गंध घेऊनच जन्माला येतात त्यांच्या अभंगामधील च नव्हे तर श्री ज्ञानेश्वरी अमृतानुभव , चांगदेव पासष्टी , हरिनामाचे महत्त्व विशद करणारा 28 अभंगाचा हरिपाठ , नऊ ओव्यांचे पसायदान , या सर्व लेखनाला पराकोटीच्या विद्वत्तेला , शब्दांना माधुर्यता लाभलेली आहे. नऊ हजार ओव्यांचे सार ग्रहण करून अवघ्या नऊ ओव्यांचे पसायदान यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींनी अखिल विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना विश्वगुरू श्री संत निवृत्तीनाथ यांचे कडे प्रसाद रुपी पसायदान मागितले आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सदभावनेचा व प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार होय! ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय होय निसर्ग हाच श्रीकृष्ण तर जाणीव हाच अर्जुन होय या दोघांमधील संवाद म्हणजे भगवद्गीता व या ग्रंथाचे साध्या सोप्या सरळ मराठी भाषेत पृथक्करण म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हा ग्रंथ होय. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन म्हणजे चांगदेव पासष्टी होय.

मानसिक शुद्ध स्नान म्हणजे 28 अभंगाचा हरिपाठ होय सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होय, हरीचे नामस्मरण करण्यासाठी राम कृष्ण हरी हा संजीवन मंत्र दिला या मंत्राने पराकोटीचे पुण्य प्राप्त होईल असे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी समाजासाठी अगाध शक्ती असलेले महान कार्य पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 21 व्या वर्षी इसवी सन 1296 मध्ये आळंदी देवाची इंद्रायणी काठी संजीवन समाधी घेतली.

नामा म्हणे – देवा भली दिली बुद्धी , लागली समाधी ज्ञानदेवा l संत नामदेव… संत ज्ञानेश्वर माऊली यांनी समाधी घेतल्यानंतर पुढील एक वर्षभराच्या कालावधी मध्येच म्हणजे इसवी सन 1297 मध्ये माऊलींच्या इतर भावंडांनी देखील समाधी घेतल्या व आपली इहलोकी यात्रा संपवली. जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कष्टविती परोपकारी

या अभंगामधी ल उक्तीप्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी समाजाचा खूप मोठ्या प्रकारचे उद्धार करण्याचे महान कार्य पार पाडले.

ll जय राम कृष्ण हरी ll.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे