ना बारामती, ना माढा, सुप्रिया सुळेंचा विदर्भातील मतदारसंघातून लोकसभा लढवण्याचा मानस ?
वर्धा

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याने पावन झालेल्या वर्धा लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवायला नक्की आवडेल, असे सूचक वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. त्यांच्या या वक्तव्याने वर्ध्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा वाढल्या आहेत.
सुप्रिया सुळे या पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत. २००६ मध्ये पहिल्यांदा राज्यसभेच्या खासदार झाल्यानंतर २००९ पासून त्या तीन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या ‘फुटी’नंतर काय होणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे बारामतीतच ‘ताईं’ची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघ वर्षानुवर्ष राखला होता.
त्यामुळे सुप्रिया सुळे बारामती नाही तर माढ्यातून उतरण्याचा मानस व्यक्त करु शकल्या असत्या. परंतु वर्ध्याचं नाव घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजप आमदार रामदास तडस विद्यमान खासदार आहेत. परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार चंद्रशेखर बावनकुळेंना वर्ध्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा विचार भाजप करत असल्याच्या चर्चा आहेत.