ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील 6 लाख 91 हजार कुटुंबांना मिळणार 100 रुपयात आनंदाचा शिधा, कोण-कोणत्या वस्तू मिळणार ?

अहमदनगर

500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीक्षेत्र अयोध्या येथे भव्य राम मंदिर तयार झाले आहे. विशेष म्हणजे या भव्य राम मंदिरात नुकताच प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. 22 जानेवारी 2024 ला अयोध्या येथे प्रभू श्री रामराया विराजमान झाले आहेत. अयोध्या येथील भव्य राम मंदिरात आता लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत.

विशेष म्हणजे आगामी काळात या मंदिरात आणखी गर्दी वाढणार असा अंदाज आहे. खरे तर प्रभू श्री रामराया टेन्टमधून उठून आता भव्य मंदिरात विराजमान झाले असल्याने रामभक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

22 जानेवारी रोजी पार पडलेल्या प्रभू श्री रामरायाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या निमित्ताने आणि पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या शिवप्रभूंच्या जयंतीदिनानिमित्ताने अर्थातच 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या शिवरायांच्या जयंतीदिनानिमित्ताने शिंदे सरकारने आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी दिवाळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने पात्र रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा वाटण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाची आनंदाचा शिधा योजना खूपच लोकप्रिय झालेली आहे.

यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून आता राज्यातील गोरगरिबांना रामरायांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवरायांचा जन्मोत्सवाचा सोहळा आनंदाने साजरा करता यावा यासाठी शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील सहा लाख 91 हजार लाभार्थ्यांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने आनंदाचा शिधा किटची मागणी शासनाकडे केली आहे.

रामरायांचे भव्य मंदिरात विराजमान झाले आहे, मात्र अजूनही आनंदाचा शिधा पात्र लाभार्थ्यांना देऊ करण्यात आलेला नाही. परंतु, 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत याचे वितरण पूर्ण होणार आहे.

शंभर रुपयात काय-काय मिळणार

राज्य शासनाच्या माध्यमातून 100 रुपयात 6 वस्तू दिल्या जाणार आहेत. एक लिटर खाद्यतेल, एक किलो साखर, अर्धा किलो चणाडाळ, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो पोहे या सहा वस्तू दिल्या जाणार आहेत. एका रेशनकार्ड धारकाला शंभर रुपयाची एक कीट मिळणार आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यासाठी लागणारा 50% आनंदाचा शिधा प्राप्त झाला असून उर्वरित 50 टक्के आनंदाचा शिधा लवकरच मिळणार आहे.

100 रुपयाचा आनंदाचा शिधा कोणाला मिळणार बरं ?

राज्य शासनाने काढलेल्या जीआर मध्ये हा शंभर रुपयाचा आनंदाचा शिधा अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थी रेशन कार्ड धारकांना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना, तसेच १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रयरेषेखालील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना वितरित केला जाईल असे सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे